कडक उन्हात का जाऊ नये?

कुतूहल : आपण सर्वजण कडक उन्हाळ्याचा अनुभव घेतच असतो. नागरिकांनी दुपारी ११ ते ४ या काळात कडक उन्हात जाऊ नये अशा सूचना अगदी सरकारी पातळीवरूनही देण्यात येतात. कडक उन्हात गेल्यामुळे आरोग्याचे अनेक गंभीर प्रश्न निर्माण होऊन बर्‍याचदा जीवावरही बेतू शकतं.

कडक उन्हाचा पहिला परिणाम आपल्या शरीराच्या तापमानावर होतो. सर्वसाधारणपणे आपल्या शरीराचं तापमान ९८.६ फॅरेनहाईट किंवा ३७ अंश सेल्सियस असतं. कडक उन्हात गेल्यावर सूर्याच्या उष्णतेमुळे आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचं तापमान वाढतं. त्यामुळे साहजिकच आपल्या शरीराचं तापमानही वाढतं. हे वाढलेलं तापमान कमी व्हावं म्हणून आपलं शरीरच काही उपाययोजना करतं. आपल्या घर्मग्रंथी कार्यरत होतात आणि आपल्याला घाम येतो. हा घाम त्वचेवर पोचला की शरीराच्या वाढलेल्या तापमानामुळे त्याचं बाष्पीभवन होतं. बाष्पीभवनामुळे शरीराचं तापमान कमी होतं. बर्‍याचदा हा घाम त्वचेखालच्या आवरणात अडकतो आणि आपल्याला त्रासदायक घामोळं येतं.

खूप घाम येणंही शरीराला योग्य नसतं. याचं कारण म्हणजे खूप घाम आला तर आधी शरीरातलं पाणी कमी होतं. इतकंच नाही तर घामावाटे शरीरातले सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम असे क्षार शरीरातून बाहेर टाकले जातात. यामुळे आपल्याला गळून गेल्यासारखं वाटतं. कडक उन्हात आपण चालत असू किंवा काही कष्टाचं काम करत असू तर शरीरातले क्षार घामावाटे बाहेर गेल्यामुळे आपल्या हातापायात गोळे येऊ शकतात. यालाच आपण ‘निर्जलीकरण (डिहायड्रेशन)’ असं म्हणतो. कडक उन्हात अतिनील किरणांचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्वचेवर भाजल्यासारखे चट्टे पडतात. डोळ्यांनाही या अतिनील किरणांचा त्रास होऊ शकतो.

शरीराचं तापमान ४० अंश सेल्सियसच्या वर गेलं तर मात्र उष्माघात होऊ शकतो. उलटी होणं, डोक्यात गोंधळ उडणं, बरळल्यासारखं बोलणं, आकडी येणं आणि शेवटी शुद्ध हरपणं अशा गोष्टी कडक उन्हात फार काळ गेलं तर सहन कराव्या लागतात. उष्माघात झाल्यास संबंधित व्यक्तीला त्वरित सावलीत आणून तिच्या शरीराचं तापमान कमी व्हावं म्हणून थंड पाणी घेऊन तिचं शरीर ओल्या फडक्याने पुसावं.

उष्णतेमुळे हृदयावरचा ताण वाढू शकतो आणि हृदयविकार असलेल्या लोकांमध्ये गंभीर गुंतागुंत होऊ शकते. कडक उन्हात जाणं अपरिहार्य असेल तर डोक्यावर घेरदार टोपी घालणं, छत्री घेणं, डोक्याला रुमाल बांधणं अशी काळजी घ्यावी. कडक उन्हामुळे निर्जलीकरण होतं आणि कधीकधी लघवीचं प्रमाणही कमी होऊ शकतं. त्यामुळे सतत पाणी, लिंबूपाणी, नारळपाणी, ताक असे द्रवपदार्थ पीत राहणं असे उपाय करून आपण कडक उन्हापासून स्वत:ला वाचवू शकतो.

✍️डॉ. माधवी ठाकूरदेसाई
मराठी विज्ञान परिषद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button