
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यात ओंकार हत्तीचा शिरकाव
दोडामार्ग तालुक्यात पुन्हा एकदा ’ओंकार’ हत्तीच्या शिरकावाने ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तब्बल पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर हा हत्ती पुन्हा कुंब्रल गावात दाखल झाला असून सोमवारी तो अक्षरशः मुख्य रस्त्यावरून निर्धास्तपणे फेरफटका मारताना दिसून आला. या घटनेने गावकर्यांची झोप उडाली आहे.
तिलारी खोर्यात दीर्घकाळ वावरणारा ’ओंकार’ हत्ती सुमारे वीस दिवसांपूर्वी कळणे गावात दाखल झाला होता. तेथून त्याने गोवा राज्याचा रस्ता धरला; मात्र काही दिवसांतच तो पुन्हा कळणे परिसरात परतला. त्यानंतर गोवा आणि सावंतवाडी तालुक्यात त्याची सततची भ्रमंती सुरू होती. आता मात्र त्याने पुन्हा दोडामार्ग तालुक्याची वाट धरत कुंब्रल गावात प्रवेश केल्याने स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांत ’ओंकार’चा वावर जंगलापुरता मर्यादित न राहता थेट मानवी वस्तीकडे वळलेला दिसत आहे. सोमवारी कुंब्रल गावातील रस्त्यावरून तो बिनधास्तपणे फिरताना दिसला. तर मंगळवारी दुपारीही तो बोर्डेकरवाडी परिसरात वावरत असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. या सततच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या हत्तीला वनविभागाने येथून पिटाळून लावण्याची मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून होत आहे.www.konkantoday.com




