
संगमेश्वर तालुक्यात धक्कादायक प्रकार, परदेशी महिलेने केलं मतदान?
संगमेश्वर तालुक्यातील आंबेड खुर्द येथे उघडकीस आलेल्या परदेशी महिलेच्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून, बनावट कागदपत्रांच्या जोरावर भारतात वास्तव्यास असलेल्या या महिलेने चक्क मतदान प्रक्रियेत सहभाग घेतल्याची धक्कादायक चर्चा रंगू लागली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, प्रशासनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सुमारे महिन्याभरापूर्वी पोलिसांनी संबंधित महिला व तिला मदत करणार्या पतीला ताब्यात घेतल्यानंतर अनेक बाबी उघड झाल्या होत्या. तपासात या महिलेकडे भारतात राहण्यासाठी आवश्यक असलेला पासपोर्ट किंवा व्हिसा नसल्याचे स्पष्ट झाले. कोणतीही वैध कागदपत्रे नसतानाही ती गेली पाच वर्षे या भागात राहत असल्याचे समोर आले होते. याचदरम्यान, तिने बनावट पॅन कार्ड आणि आधार कार्ड तयार करून घेतल्याचेही उघड झाले. या कागदपत्रांच्या आधारे एका बँकेत खाते उघडून व्यवहार सुरू केल्याने बँकिंग सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित झाले होते.
www.konkantoday.com




