
लांज्यात महामार्गाचे गटार खचून ट्रक कलंडला
लांजा शहरात मुंबई-गोवा महामार्गाचे काम गतीने सुरू आहे. मात्र तीन महिन्यांपूर्वी महामार्गाचे बांधलेले गटार खचल्याने चिरेवाहू ट्रक कलंडला. ही घटना गुरुवारी सकाळी लांजा हायस्कूल समोर घडली. वाहने व नागरिकांची वर्दळ नसल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. घाईगडबडीत करण्यात येत असलेल्या कामाचा दर्जा मात्र या घटनेने समोर आला आहे. त्यामुळे नागरिकांनी महामार्ग विभागाच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोकणवासीयांना दिले आहे. मात्र आश्वासन पूर्णत्वाकडे नेण्याच्या प्रयत्नांत असताना लांजा शहरात कामाच्या निकृष्ट दर्जाचा नमुना गुरुवारी उघडकीस आला. मुंबई-गोवा महामार्गाच्या उड्डाणपूल व सर्व्हिस रोड काम गतिने सुरू आहे. लांजा शहरात महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाबाबत अनेकवेळा नागरिकांनी प्रश्न उपस्थित करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मात्र मे अखेरीस महामार्ग पूर्ण करण्याच्या प्रयत्नात मार्गाच्या दर्जाबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
www.konkantoday.com




