
वादळी पावसात दापोली महावितरण उपविभाग कार्यालयाचे छप्पर उडाले; १५ दिवसांनंतरही दुरुस्तीची प्रतीक्षा
दापोली : दापोली येथील महावितरणच्या उपविभाग कार्यालयाचे छप्पर वादळी पावसामुळे सुमारे १५ दिवसांपूर्वी उडून नुकसान झाले असून, अद्याप दुरुस्ती न झाल्याने कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत असल्याची माहिती समोर आली आहे.
छताचे पत्रे उडाल्यामुळे पावसाचे पाणी कार्यालयात गळत असून, त्यामुळे दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण होत आहेत. तसेच कार्यालयातील संगणकीय उपकरणे, प्रिंटर आणि महत्त्वाची शासकीय कागदपत्रे खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याशिवाय, कार्यालयातील महिला शौचालयही अनेक दिवसांपासून नादुरुस्त असल्याचे सांगितले जात असून, त्याबाबत संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही आवश्यक दुरुस्ती झालेली नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे कर्मचारी तसेच कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर कार्यालयाच्या छताची तातडीने दुरुस्ती करून पाणीगळती थांबवावी, तसेच महिला शौचालयासह अन्य मूलभूत सुविधांची दुरुस्ती करावी, अशी मागणी कर्मचारी आणि नागरिकांकडून होत आहे.



