
रत्नागिरी जिल्ह्यात सरत्या आर्थिक वर्षात मद्यविक्रीने नवा उच्चांक गाठला
निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात सरत्या आर्थिक वर्षात मद्यविक्रीने नवा उच्चांक गाठला आहे. सन २०२४-२५ या वर्षात जिल्ह्यात विक्रमी मद्यविक्री झाली असून, देशी दारूपासून ते विदेशी मद्य आणि चिल्ड बिअरपर्यंत सर्व प्रकारच्या पेयांचा मोठ्या प्रमाणावर खप झाल्याचे चित्र समोर आले आहे.
महसुलाच्या दृष्टीने ही आकडेवारी समाधानकारक असली, तरी सामाजिक स्तरावर वाढत्या मद्यप्राशनामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात मद्यप्राशनात बिअरने सर्वाधिक पसंती मिळवली आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात तसेच पर्यटन हंगामात पर्यटकांची वाढती संख्या यामुळे तब्बल ५९ लाख लिटर बिअरची विक्री झाली आहे. उष्ण हवामान आणि तरुणाईतील वाढती क्रेझ यामुळे बिअरचा खप मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते.
बिअरनंतर विदेशी मद्याने बाजारपेठेत आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. जिल्ह्यात सुमारे ३४ लाख लिटर विदेशी मद्याची विक्री झाली असून, मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू वर्गात याला मोठी मागणी असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, सर्वसामान्य कष्टकरी वर्गात लोकप्रिय असलेल्या देशी मद्याची विक्री २० लाख लिटरच्या घरात पोहोचली आहे. ग्रामीण भागात देशी मद्याला अजूनही मोठी मागणी असल्याचे चित्र आहे. तुलनेने वाईनला अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यात केवळ १ लाख लिटर वाईनची विक्री झाली आहे. वाईन प्रामुख्याने विशिष्ट वर्गापुरती मर्यादित असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.www.konkantoday.com




