
रत्नागिरीतील आयटीआयना दक्षचा दर्जा, रत्नागिरी जिल्ह्याने छाप उमटवली
कोकणातील तरुणांच्या हाताला आता जागतिक दर्जाचे कौशल्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या ’दक्ष’ प्रकल्पांतर्गत राज्यातील निवडक औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याने आपली ठसठशीत छाप उमटवली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील तंत्रशिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी प्रगतीची नवी दारे खुली झाली आहेत.
राज्य सरकारने दि. १६ एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार, रत्नागिरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला) या दोन्ही संस्थांची ’दक्ष आयटीआय’ म्हणून निवड करण्यात आली आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या ’आयटीआय रँकिंग फ्रेमवर्क’मधील कठोर निकषांवर या संस्थांनी उत्कृष्ट कामगिरी करत ही निवड मिळवली आहे. संस्थात्मक क्षमता, प्रशासन, गुणवत्तापूर्ण शिक्षण, उद्योगांशी सहभाग आणि विद्यार्थ्यांचा निकाल अशा ८९ निकषांवर या संस्थांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. ’दक्ष’ प्रकल्पाचा उद्देश आयटीआयचा दर्जा उंचावून त्यांना आधुनिक काळाच्या गरजांनुसार सक्षम करणे हा आहे.
www.konkantoday.com




