महिला आरक्षण विधेयक हे भाजपचे राजकीय षडयंत्र; विनायक राऊत यांचा घणाघात


रत्नागिरी : भाजपने आणलेले महिला आरक्षण विधेयक हे प्रत्यक्षात महिलांच्या हितासाठी नसून, लोकसभेचे मतदारसंघ स्वतःला पूरक कसे ठरतील यासाठी रचलेले एक राजकीय षडयंत्र आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. रत्नागिरी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महिला आरक्षण, शेळके अपघात प्रकरण आणि राज्यातील वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यावरून सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.
विनायक राऊत म्हणाले की, “२०२३ मध्ये विधेयक मंजूर झाले असताना पुन्हा ते मांडण्याची गरज काय होती? भाजपला या विधेयकाच्या आडून मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा आपला पक्षीय अजेंडा राबवायचा आहे. वास्तविक पाहता, सध्याच्या खासदार संख्येनुसारच ३३ टक्के आरक्षण द्यायला हवे होते, मात्र तसे न करून महिलांना आरक्षणापासून वंचित ठेवले गेले आहे, ही दुर्दैवी बाब आहे. खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्या नाराजीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, कदाचित त्यांनी विधान नीट ऐकले नसेल, पण अभ्यास केल्यावर त्यांनाही समजेल की हे विधेयक महिलांच्या हिताचे नव्हतेच.”
शेळके अपघात प्रकरणावर बोलताना राऊत यांनी हा अपघात नसून ‘घातपात’ असल्याचा पुनरुच्चार केला. अशोक खरात हा तुरुंगातूनही अशा घटना घडवू शकतो, असा दावा करत त्यांनी या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचे कारनामे उघड होतील, असे संकेत दिले. दीपक केसरकर यांना एसआयटी का बोलावून चौकशी करत नाही? यामागे कोणाचा राजकीय वरदहस्त आहे? असे सवालही त्यांनी उपस्थित केले.
राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर बोट ठेवताना राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. अमृता फडणवीस यांच्या दाव्याचा दाखला देत ते म्हणाले की, फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्र ड्रग्जच्या आहारी जात असून पश्चिम महाराष्ट्र ड्रग्जचे हब बनले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गात गोव्यातून येणाऱ्या ड्रग्जवर बंदी घालण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी पुन्हा विधान परिषदेचे सदस्य व्हावे, अशी विनंती सर्व नेत्यांनी केल्याचे सांगतानाच, शिंदे गटाच्या वरळी महोत्सवाचा त्यांनी ‘मोर नाचतो म्हणून तुडतुडा नाचतो’ अशा शब्दात समाचार घेतला. वरळीत आदित्य ठाकरेंच्या अस्तित्वाला कोणताही धोका नसून, शिंदे गट सध्या एकमेकांच्या ‘उरावर’ बसला असल्याची बोचरी टीकाही त्यांनी यावेळी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button