
पिण्याच्या पाण्यात रसायन, नागरिकांची तब्येत बिघडली” सुप्रिया कंपनीवर आरोप
खेड तालुक्यातील पिरलोटे गावात नळांना रासायनिक सांडपाणी मिसळून पिवळसर पाणी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत अनेक ग्रामस्थांना त्रास झाल्याने सुमारे १० ते १२ जणांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी संतप्त ग्रामस्थांनी सुप्रिया लाइफ सायन्स कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत.
बुधवार दि. २२ रोजी सकाळी सात ते नऊ वाजण्याच्या दरम्यान दत्तवाडी, विठ्ठलवाडी आणि गावठाणवाडी येथे नळांना पिवळ्या रंगाचे, उग्र वासाचे पाणी येऊ लागले. काही ग्रामस्थ व लहान मुलांनी नकळत हे पाणी प्यायले; मात्र त्याचा विचित्र वास जाणवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
घटना समजताच ग्रामस्थांनी एमआयडीसी कार्यालयात धाव घेतली; मात्र त्या वेळी अधिकारी अनुपस्थित असल्याने संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर एमआयडीसीचे अधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावण्यात आले.
या घटनेत खालील ग्रामस्थांना त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले: विष्णनाथ संजीव यादव, मिर्जा दामाशा शेख, मेहबूब असलम शेख, आराध्या बालकृष्ण चाळके, शंभू रमेश चाळके, महेश सखाराम गोवळकर, रविना सुभाष माळी, करण सुनील चव्हाण, साकेत संदीप जाधव, योगेश बाळासाहेब शेख, सुहास विलास चाळके, शाहिद मनेवर शेख, रिझवान केशव शेख, महेश महेश चाळके, विनोद विनायक चव्हाण आदी.
ग्रामस्थांनी संबंधित रासायनिक सांडपाणी हे सुप्रिया लाइफ सायन्स कंपनीचे असल्याचा आरोप केला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांडपाणी त्यांच्या कारखान्यातूनच आल्याचे मान्य करत, सांडपाणी वाहिनी चोकअप झाल्यामुळेच हा प्रकार घडल्याचे स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर, दोषींवर कठोर कारवाई करून सुरक्षित पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.




