देवरुखच्या रांगोळीकर विलास रहाटे यांनी वाळूशिल्पातून दिली महामानवाला मानवंदना



रत्नागिरी :-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देवरुखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार श्री. विलास रहाटे यांनी
रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावरील वाळूचा वापर करून त्यांनी बाबासाहेबांची अत्यंत देखणी आणि जिवंत वाटणारी चित्रकृती साकारली आहे.

ही चित्रकृती वैशिष्ट्यपूर्ण ठरण्याचे कारण म्हणजे यामध्ये कोणत्याही कृत्रिम रंगाचा वापर न करता निसर्गातील वाळूचा वापर करण्यात आला आहे. रत्नागिरीतील पांढऱ्या समुद्रातील शुभ्र वाळू आणि भाट्ये बीचवर आढळणारी काळी वाळू अशा दोन भिन्न रंगांच्या वाळूचा मेळ घालून विलास रहाटे यांनी केवळ दोन तासांच्या कालावधीत हे ‘सँड पोर्ट्रेट’ पूर्ण केले. अथांग सागराच्या किनारी महामानवाचे हे रूप पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.

श्री.विलास रहाटे हे आपल्या कल्पकतेसाठी ओळखले जातात. गेल्या वर्षी त्यांनी पिंपळाच्या पानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जगातील सर्वात लहान रांगोळी साकारून विश्वविक्रमी कामगिरी केली होती.

यावर्षी वाळूशिल्पातून त्यांनी पुन्हा एकदा आपल्या कलेची छाप पाडली आहे. बाबासाहेबांच्या विचारांना कलेच्या माध्यमातून वंदन करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे,अशी भावना यावेळी रहाटे यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button