
जैतापूर खाडी पुलावर महावितरणकडून टाकण्यात आलेली ११ केव्ही विद्युत वाहिनी धोकादायक
जैतापूर-धाउलवल्ली गावांना जोडणाऱ्या सागरी महामार्गावरील सुमारे ५०० मीटर लांबीच्या जैतापूर खाडी पुलावर महावितरणकडून टाकण्यात आलेली ११ केव्ही विद्युत वाहिनी धोकादायक ठरत असल्याची भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पुलावरून उघड्यावरून नेण्यात आलेली केबल भविष्यात अपघातास कारणीभूत ठरू शकते, अशी गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
पर्यटनदृष्ट्या महत्त्व असलेल्या या पुलावर दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिक सूर्योदय-सूर्यास्त पाहण्यासाठी तसेच खाडीतील निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेण्यासाठी येत असतात. अशा ठिकाणी उघड्या स्वरूपात टाकलेली केबल सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, महावितरणकडून विविध गावांमध्ये अंडरग्राउंड केबल टाकण्याचे काम सुरू असताना अनेक ठिकाणी रस्त्यांची हानी झाल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. आवश्यकतेनुसार हाताने खोदकाम करण्याऐवजी जेसीबीच्या सहाय्याने काम करण्यात आल्याने पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्यात या कामाचे दुष्परिणाम प्रकर्षाने जाणवतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
जैतापूर खाडी पुलावर दोन ११ केव्ही केबल टाकताना सुरक्षेची पुरेशी काळजी घेतलेली नसल्याचे दिसून येत आहे. पुलाच्या कठड्यावरील लोखंडी बारवरून उघड्या स्वरूपात केबल नेण्यात आल्यामुळे धोका वाढला आहे. विशेषतः सायंकाळच्या वेळी येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक व स्थानिक नागरिकांची गर्दी होत असल्याने कोणतीही दुर्घटना घडल्यास गंभीर परिणाम संभवतात.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता, महावितरणला कामासाठी परवानगी देण्यात आल्याचे सांगण्यात आले. केबल सुरक्षित पद्धतीने नेण्याबाबत सूचना देण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. संबंधित ठेकेदाराकडून केबल सिमेंट ब्लॉकमध्ये बंदिस्त करण्यात येणार असल्याचे सांगितले गेले होते; मात्र प्रत्यक्षात केबल उघड्यावरूनच टाकण्यात आल्याचे दिसत आहे.
या प्रकारामुळे पुलाचे विद्रूपीकरण झाल्याचीही नागरिकांची भावना असून, महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे. भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास संबंधित विभाग व स्थानिक लोकप्रतिनिधींना जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
प्रशासनाने या गंभीर बाबीकडे तात्काळ लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.




