जिल्हा परिषद आरोग्य समिती सभा संपन्न

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत आरोग्य समितीची सभा आरोग्य समितीचे अध्यक्ष विलास चाळके यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली.
सभेला आरोग्य समिती सदस्य म्हणून साधना महाजन, जाई आंब्रे, पूजा निकम, संतोष थेराडे, विक्रांत जाधव, ॲड. महेंद्र मांडवकर, मनीषा लाखण, विनिता गांगण उपस्थित होते. तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विकास कुमरे तसेच सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. विवेकानंद बिराजदार यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये यांनी समिती अध्यक्ष व सर्व सदस्यांचे स्वागत केले. त्यानंतर विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
गरोदर मातांना सोनोग्राफी सेवा सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी खाजगी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. तसेच रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण जास्त असल्यामुळे एक्स-रे सुविधा व तज्ज्ञ डॉक्टर ची उपलब्धता यावर उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील जास्त ओपीडी असलेल्या आरोग्य संस्थांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दरवर्षी “आदर्श डॉक्टर पुरस्कार” देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.

यासोबतच सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या मोफत रक्त तपासणी सेवांबाबत व्यापक जनजागृती व प्रचार-प्रसिद्धी करण्यावर भर देण्यात आला. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सुरू केलेल्या फिरती कर्करोग तपासणी वॅनसारख्या चांगल्या उपक्रमासाठी अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला. वाहन चालक पगार, ॲम्ब्युलस निर्लेखिकरण, आयुष्यमान कार्ड व योजना याबाबत चर्चा करण्यात आली.
पीएचसी, आरएच व उपजिल्हा रुग्णालय स्तरावर आवश्यक मनुष्यबळ उपलब्धतेचा आढावा घेऊन रिक्त पदे भरण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.आरोग्य सेविका व गट ड रिक्त पदांचा आढावा घेऊन पद भरतीबाबत चर्चा करण्यात आली. गट ड पदभरती सध्या कंत्राटी तत्वावर करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
रुग्णालयांमध्ये औषधसाठा नियमित व पुरेशा प्रमाणात ठेवण्यावर भर देण्यात आला.
जन आरोग्य समिती समिती स्थापन करून निधीचा प्रभावी व पारदर्शक वापर करण्याबाबत निर्देश देण्यात आले.
आरोग्य संस्थांमधील साफसफाई, स्वच्छता व रुग्णाभिमुख सेवा सुधारण्यासाठी विशेष लक्ष देण्याचे ठरविण्यात आले.
ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सोलर ऊर्जेच्या माध्यमातून बंद पडलेले ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्याबाबतही चर्चा झाली. तसेच जन आरोग्य समित्यांचे बळकटीकरण, विविध आरोग्य दिनांचे प्रभावी आयोजन व जनजागृती वर तसेच डीपीसी अंतर्गत आरोग्य विभागातील बांधकाम व इतर कामांवरील खर्चाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीत आरोग्य सेवा अधिक प्रभावी, सुलभ व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण निर्णय व सूचना देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button