
आर्यन धुळप याची बुद्धिबळात उल्लेखनीय कामगिरी
रत्नागिरी येथील आर्यन अभय धुळप या बुद्धिबळपटूने मागील काही कालावधीत विविध स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण यश प्राप्त केले आहे. नुकत्याच कुडाळ येथे नामदार श्री. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या खासदार चषक खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत आर्यनने ७ फेऱ्यांमध्ये ५ गुणांसह खुल्या गटात पारितोषिक प्राप्त केले. तसेच सांगली येथे पार पडलेल्या खुल्या फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातून सर्वोत्तम द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळवले.
तत्पूर्वी रत्नागिरीत संपन्न झालेल्या कै. रामचंद्र सप्रे स्मृती राज्य अमॅच्युअर अजिंक्यपद क्लासिकल फिडे मानांकन स्पर्धेत आर्यनने १४२९ इतके क्लासिकल फिडे गुणांकन प्राप्त केले. आर्यनने नुकतीच इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा दिली. परीक्षेच्या तयारीत असताना पण अभ्यास सांभाळून विविध बुद्धिबळ स्पर्धांत सहभागी होत यश प्राप्त केल्या बद्दल त्याचे विशेष कौतुक होत आहे.




