
बस पकडताना अज्ञात चोरट्याने साधला डाव; मंगळसूत्रासह अंगठी चोरीला
साखरपा बसस्थानकात महिलेच्या पर्समधून अडीच लाखांचे दागिने लंपास
रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा बसस्थानक येथे बसमध्ये चढत असताना एका महिला प्रवाशाच्या पर्समधील सुमारे २ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सौ. विनिता विकास अवसरे, मूळ राहणार प्रभानवल्ली-वाणेवाडी, या आपल्या पतीसह संगमेश्वर तालुक्यातील अंतरवली येथे जाण्यासाठी साखरपा बसस्थानकात आल्या होत्या. कोल्हापूरहून संगमेश्वरमार्गे चिपळूणकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या खांद्याला लावलेल्या पर्समधील छोट्या पाकिटावर डल्ला मारला.
या पाकिटात अंदाजे पाच तोळे वजनाचे सुमारे २ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र तसेच सुमारे १५ हजार रुपये किमतीची ३.५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी ठेवण्यात आली होती. दोन्ही दागिने मिळून सुमारे २ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला.
बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेत चोरट्याने ही चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.




