निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी पोलीस दलाकडून रूट मार्च

रत्नागिरी : उद्या (७ फेब्रुवारी) होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते.

या रूट मार्चच्या माध्यमातून जिल्हाभरात पोलीस दलाची ठोस उपस्थिती अधोरेखित करण्यात आली असून, समाजकंटक व कायदा भंग करणाऱ्यांना कडक संदेश देण्यात आला. आगामी जिल्हा परिषद व पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचा अनूचित प्रकार घडू नये यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचा स्पष्ट संदेश या रूट मार्चद्वारे देण्यात आला आहे.

हे रूट मार्च पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या रूट मार्चमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रमुख, पोलीस अंमलदार, दंगल नियंत्रण पथक (आरसीपी), एसआरपीएफ कंपनीचे अधिकारी व अंमलदार तसेच होमगार्ड दलाच्या जवानांचा सहभाग होता.

तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने, देवरुख पोलीस ठाणे हद्दीत पोलीस अधीक्षक श्री. बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्री. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली देवरुख पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक उदय झावरे यांचे नेतृत्वाखाली रत्नागिरी पोलीस दलातर्फे मतदान जनजागृती रॅली व पथनाट्य आयोजित केले होते. या उपक्रमामध्ये देवरूख पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार, तसेच आठल्ये सप्रे महाविद्यालयाचे शिक्षक वर्ग व विद्यार्थी, महसूल विभाग व गटविकास अधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button