
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या गुहागर केंद्रातर्फे आबलोली येथे बैठक
गुहागर तालुका कुणबी नागरी पतसंस्था मर्यादित आबलोली या पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयातील सभागृहात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र, विभाग रत्नागिरी, गुहागर केंद्राच्या वतीने सचिव केदार चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक उत्साहात संपन्न झाली.
यावेळी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आले. तसेच येणाऱ्या काळात उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. जिल्हा परिषद गटातील पूर्ण प्राथमिक शाळा, हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व मोफत वह्या वाटप कार्यक्रम निश्चित करण्यात आला. या कार्यक्रमाचे पूर्वनियोजन करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती.
यावेळी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र या संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे यांनी घेतलेला “कोकणचा सर्वांगीण विकास हाच जिजाऊंचा ध्यास” तसेच “माझ्या समाजाचा मी ऋणी लागतो गरिबांच्या सेवे इतके पुण्य जगात कोणतेही नाही” हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून समाजासाठी मोफत योगदान देणारे निलेश सांबरे यांच्या अधिपत्याखाली संपूर्ण महाराष्ट्रभर आरोग्य, शैक्षणिक, रोजगार असे सर्वांसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. हे उपक्रम राबवताना कुठलाही जात, धर्म पाळला जात नाही. कुठलाही पक्षभेद केला जात नाही. महिला पुरुष समानता राखून गुहागर तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटातील प्रत्येक वाडीत जाऊन शैक्षणिक साहित्य वाटप हा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. या सामाजिक उपक्रमात अनेकांनी सहभागी होऊन योगदान द्यावे, असे आवाहन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे सचिव केदार चव्हाण यांनी केले व विधायक उपक्रमांची मौलिक माहिती दिली.
यावेळी जिल्हा परिषद गटनिहाय नियोजन करण्यात आले. दिवाळी सुट्टीनंतर शाळा सुरू झाल्यावर शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था सचिव केदार चव्हाण, गुहागरचे सदस्य अनंत डिंगणकर, ओमकार तिवरेकर, तुकाराम निवाते, यशवंत पागडे, प्रमेय आर्यमाने, संदेश कदम, अनिकेत पागडे (आबलोली), विशाल गोताड, संदीप भरणकर (आवरे), रमेश देसाई (कुडली), शंकर जोशी (शिवणे) आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.




