
कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता ,राज्यातील थंडी गायब
पावसाला पोषक हवामान, उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह कमी झाल्याने राज्यात थंडी गायब झाली आहे. राज्यात ढगाळ आकाश झाले असून, आज (ता. २५) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची, तसेच राज्यातील किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.सोमवारी (ता.२४) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे नीचांकी १२.८ अंश तापमान नोंदले गेले. राज्यात ६ अंशांपर्यंत आलेले किमान तापमान पुन्हा १२ अंशांच्या वर गेले आहे. बहुतांश ठिकाणी तापमान १४ अंशांच्या वर गेल्याने थंडी गायब झाली आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका तापदायक ठरत असून, उकाडा वाढू जाणवू लागला आहे. तापमानाचा पारा तिशीपार असून, सोमवारी (ता.२४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी येथे ३३.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
दक्षिण भारतासह, कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाला पोषक हवामान झाले असून, राज्यात आकाश ढगाळ होत आहे. आज (ता. २५) राज्याच्या तापमानातील वाढ कायम राहणार असून, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत ढगाळ आकाश, विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.




