जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून जिल्ह्याच्या किनारपट्टीच्या सुरक्षेचा आढावा

मच्छिमार बांधवांशी साधला थेट संवाद

रत्नागिरी : जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षेला बळकटी देण्यासाठी व स्थानिक मच्छीमार तसेच नेपाळी खलाशी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने २२ सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी मिरकरवाडा जेट्टी येथे भेट दिली व तेथील उपस्थित सर्व मच्छीमार बांधवांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी नेपाळी खलाशांनी माहिती घेतली. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील किनाऱ्यावरील सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेतला. किनारपट्टीवरील असणाऱ्या बोटींची तपासणी व पाहणी देखील केली.

या प्रसंगी पोलीस अधीक्षक श्री. बगाटे यांनी स्वतः रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील नौका विभागातील जवानांसोबत सागरी गस्त करत समुद्र किनाऱ्याची पाहणी केली. या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी, पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) श्रीमती राधिका फडके, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील, जिल्हा सुरक्षा शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन भोईर तसेच पोलीस दलातील नौका विभागाचे पोलीस अंमलदार उपस्थित होते.

या वेळी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी किनारपट्टीवरील अवैध हालचालींवर आळा घालण्यासाठी पोलीस दल व स्थानिक मच्छीमार यांच्यातील समन्वय महत्त्वाचा असल्याचे सांगितले. तसेच समुद्रात कुठलीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलीस प्रशासनास कळविण्याचे आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button