
स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईमध्ये ३ कोटींची व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) जप्त
रत्नागिरीतील एमआयडीसी परिसरात कारवाई; तिघे ताब्यात
रत्नागिरीतील एमआयडीसी परिसरातून ३ किलो ४ ग्राम वजन असलेली ३ कोटी १० लाख ३० हजार रुपये किंमतीची व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असेल तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालत असताना एमआयडीसी परिसरात बाफना मोटर्सच्या शेजारी काही तरुण लुप्तप्राय प्रजातीच्या (व्हेल) माशाची उलटी (अंबरग्रीस) विक्रीसाठी घेऊन येणार असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने एमआयडीसीतील बाफना मोटर्सच्या शेजारी सापळा रचून ३१ ऑक्टोबर रोजी या परिसरात छापा टाकला. यात रोहित रमेश चव्हाण (रा. आंबेशेत, ता. रत्नागिरी), आसिफ अस्लम मोरस्कर (रा. पिंपरी बुद्रुक, ता. चिपळूण) आणि तेजस परशुराम कांबळे (रा. आडरे, ता. चिपळूण) यांच्याजवळ व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) कोणतीही परवानगी न घेता, विनापरवाना आपल्या ताब्यात विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी या तिघांवर रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात वन्य जीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या तिघांच्या ताब्यातून ३ किलो ४ ग्राम वजनाची ३ कोटी १० लाख ३० हजार रुपये किंमतीची व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) आणि गुन्ह्यात वापरलेले एक वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे.
ही कारवाई रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक प्रशांत बोरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल, बाळू पालकर, गणेश सावंत, प्रवीण खांबे, सत्यजित दरेकर, चालक पोलीस कॉन्स्टेबल अतुल कांबळे, यांनी पार पाडली.




