पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राजापूर नगर परिषदेची आतापासूनच उपाययोजना

राजापूर : यावर्षी कमी प्रमाणात झालेला पाऊस आणि भविष्यात निर्माण होणारी भीषण पाणीटंचाई लक्षात घेऊन राजापूर नगर परिषद प्रशासनाने आतापासूनच तयारी हाती घेतली आहे. कोदवली येथील सायबाच्या धरणाच्या वरच्या बाजूला बंधारा बांधून आतापासूनच पाणीसाठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बुधवारी मुख्याधिकारी प्रशांत भोसले व मुख्य लिपिक जितेंद्र जाधव यांनी यासाठी प्रत्यक्ष धरणस्थळी भेट देऊन पाहणी केली.
शहराला नैसर्गिकरित्या पाणीपुरवठा करणार्‍या कोदवली येथील सायबाच्या धरणाच्या खालील बाजूस सध्या नवीन धरणाचे काम सुरू आहे. सध्या हे काम अपूर्ण असून या कामासाठी आणखी निधीची आवश्यकता आहे. तर धरणातील गाळ काढण्याचे काम देखील प्रस्तावित आहे. यासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू असून शासनाकडे त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. यासाठी आणखी सुमारे सहा कोटी रूपयांच्या निधीची आवश्यकता आहे.
मात्र यावर्षी कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे आणि दिवसेंंदिवस वाढत चाललेल्या उष्ण तापमानामुळे पाण्याच्या पातळीत घट होत आहे. त्यातच कोदवली धरणात मोठ्या प्रमाणावर साचलेला गाळ पाहता पाणीसाठा होणे कठीण झाले आहे. त्यामुळे यावर्षी अगदी डिसेंबरपासून देखील पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासनाने आतापासूनच नियोजन हाती घेतले आहे. कोदवली आणि शीळ जॅकवेल परिसरात दरवर्षी नगर परिषद प्रशासन वनराई बंधारे बांधून पाणी अडवते. मात्र यावर्षी कोदवली धरणात तसेच जुन्या आणि नवीन धरणामध्ये असलेल्या भागात पाणीसाठा कायमस्वरूपी टिकून राहावा, यासाठी जुन्या धरणाच्या वरच्या बाजूला एक मोठा बंधारा बांधण्याचे नियोजन करण्यात आल्याचे मुख्याधिकारी भोसले यांनी सांगितले. यासाठी बुधवारी भोसले व मुख्य लिपिक जितेंद्र जाधव यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
यासाठी तत्काळ निविदा काढून ऑक्टोबरमध्येच या ठिकाणी मोठा बंधारा बांधण्यात येणार असल्याचे भोसले यांनी सांगितले. जेणेकरून वरून येणारा पाणीसाठा या बंधार्‍यात साठून राहील. त्यानंतर आवश्यकतेनुसार हे पाणी खाली धरणाकडे घेऊन ते तालीमखाना साठवण टाकीत आणले जाईल. शिळ जॅकवेलकडील पाणीपुरवठा वाहिनी टाकणे, बंधारे बांधणे ही कामे देखील मार्गी लावली जाणार असल्याचे मुख्याधिकारी भोसले यांनी
सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button