जि.प. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महायुतीची पालकमंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक


जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजताच रत्नागिरीच्या राजकीय मैदानात महायुतीच्या हालचालींना वेग आला आहे. मकर संक्रांतीचा मुहूर्त साधून पालकमंत्री उदय सामंत यांच्या पाली येथील निवासस्थानी शिवसेना आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. मात्र या बैठकीत जागावाटपाचा प्रश्‍न अद्याप सुटलेला नाही. कोणतीही ठोस घोषणा न होताच ही बैठक आटोपली. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक कायम राहिली आहे.
नगर परिषद आणि नगरपंचायतीमधील विजयाचा फॉर्म्युला जिल्हा परिषद, पं. स. निवडणुकीतही राबवण्यावर सेना-भाजपचे एकमत झाले आहे. पालीतील बैठकीत माजी आमदार डॉ. विनय नातू, अनिकेत पटवर्दन आणि भाजपचे जिल्हा निवडणूक प्रभारी ऍड. दीपक पटवर्धन यांच्यासह दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रांच्या माहितीनुसार बैठकीत प्रत्येक गटाच्या आणि गणाच्या ताकदीवर साधक-बाधक चर्चा झाली.
या बैठकीत युतीवर शिक्कामोर्तब झाले असले तरी कुणी किती जागा लढवायच्या यावर बोलणी अडकल्याचे दिसत आहे. महायुतीबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. मात्र जागावाटप किंवा उमेदवारांच्या नावावर अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, असे सांगितले जात आहे. त्यामुळे सध्या तरी वेट ऍण्ड वॉचची भूमिका स्पष्ट केली जात आहे. वरिष्ठांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच अधिकृत यादी बाहेर येण्याची शक्यता आहे.
१६ जानेवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. हातात अवघे दोन दिवस उरल्याने नेत्यांच्या दरबारी इच्छुकांची मोठी कर्दी पहायला मिळत आहे. ठोस निर्णय झाला नाही तरी तयारीला लागा असे संकेत नेत्यांकडून दिले जात आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button