
प्लॅस्टिक मुक्तीसाठी राबवित असलेल्या मोहिमेला काही नागरिकांकडून गालबोट, वाशिष्ठीत तरंगतोय प्लास्टिक कचरा
चिपळूण शहरातून वाहणार्या वाशिष्ठी नदीत ठिकठिकाणी सध्या प्लास्टिकचा कचरा तरंगताना दिसत आहे. त्यामुळे नगर परिषद, संस्था प्लास्टिक मुक्तीसाठी राबवत असलेल्या मोहिमेला नागरिक हरताळ फासत असल्याचे दिसून येत आहे. तसेच नदीच्या पाण्याचा रंगही हिरवा दिसत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
गेल्या काही वर्षापासून शहरात मिळणार्या शेकडो टन प्लास्टिकच्या कचर्याने नगर परिषदेची झोप उडवली आहे. त्यातच २०२१ साली आलेल्या महापुरानंतर शहरात हजारो टन प्लास्टिकचा कचरा मिळाला होता. त्यावेळी ’नद्यांनी परत केला व्याजासह प्लास्टिकचा कचरा’ या मथळयाखालील एका दैनिकातील वृत्त सर्वांना विचार करायला लावणारे ठरले होते. महापुरानंतर प्लास्टिकचा कमीत कमी वापर करुन शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी नगर परिषद सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्याला अनेक संस्था हातभार लावत आहेत.
यातूनच प्लास्टिक जमा करुन देणार्या महिलांसाठी खेळ पैठणीचा हा आगळावेगळा कार्यक्रम प्रशासन घेत आहे. तसेच काही प्रतिकृती साकारुन प्लास्टिकचे दुष्परिणाम नागरिकांना समजावून सांगण्याचा प्रयत्नही अनेक कलाकार व नगर परिषद करीत आहे. मात्र त्याचा तितकासा परिणाम नागरिकांवर होत नसल्याचे दिसून येत आहे. सध्या बाजारपूल परिसर, गोवळकोटरोड आदी भागात वाशिष्ठी नदीत मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा तरंगताना दिसत आहे. यामुळे नदीपात्र घाणेरडे झाले आहे. याच नदीतील पाणी नागरिकांना पुरवले जात आहे. त्यामुळे आरोणाचा प्रश्नही उभा ठाकणार आहे.www.konkantoday.com




