
चिपळूणच्या पूररेषेचे फेरसर्वेक्षण करा, आ. शेखर निकम यांची जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी
चिपळूण शहर व परिसरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी आमदार शेखर निकम यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पूररेषेचे फेरसर्वेक्षण करण्याची लेखी मागणी केली आहे. आमदार निकम यांचे पत्र सामाजिक कार्यकर्ते राजेश वाजे यांनी काल मंत्री गिरीश महाजन यांना मुंबईत सादर केले. तसेच मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली. यावेळी आमदार निकम उपस्थित होते.
आमदार निकम यांनी पत्रात नमूद केले आहे की, चिपळूण शहर व परिसरावर सन २०२१ मध्ये पूररेषा आखण्यात आली होती. मात्र २०२१ पासून जलसंपदा विभाग व नाम फाउंडेशनच्या माध्यमातून वाशिष्ठी व शिव नदीतील जवळपास २२ लाख क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे. नदीतील बेटे व अडथळे काढल्याने पाणी वहन व प्रवाह क्षमता वाढली आहे. या कामांमुळे गेल्या चार वर्षांत अतिवृष्टी होऊनही दोन्ही नद्यांनी इशारा पातळीही गाठली नाही. त्यामुळे २०२१ साली आखलेली पूररेषा आता सद्यस्थितीशी सुसंगत राहिलेली नाही. २२ लाख क्यूबिक मीटर गाळमुक्तीमुळे निळी व लाल रेषा नदीपात्राच्या दिशेने सरकणार आहेत. त्यामुळे बाधित क्षेत्रातील नागरिकांना दिलासा मिळेल. फेरसर्वेक्षण तातडीने होणे गरजेचे आहे, अशी विनंती आमदार निकम यांनी मंत्री महाजन यांच्याकडे केली आहे.




