​१० वी, १२ वी पुरवणी परीक्षेसाठी राज्य मंडळाकडून समुपदेशकांची नियुक्ती; ‘मुक्तांगण मित्र’चीही लाभणार साथ


रत्नागिरी, दि. १६ ):-​महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या पुरवणी परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांमधील ताणतणाव कमी करण्यासाठी आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावर समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
​मंडळाने जाहीर केल्यानुसार, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) पुरवणी परीक्षा दि. १६ जून २०२६ ते दि. ३० जून २०२६ या कालावधीत आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) पुरवणी परीक्षा दि. १६ जून २०२६ ते दि. ०८ जुलै २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे.
​या परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन समुपदेशन सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून, राज्य मंडळ स्तरावरून नियुक्त करण्यात आलेल्या समुपदेशकांशी खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल:
​७२०८४२९३८१
​९४०४७८३९९६
​९९६०६४४४११
​’मुक्तांगण मित्र’ व इतर हेल्पलाईनद्वारेही समुपदेशन
​या जून-जुलै २०२६ च्या परीक्षेपासून मंडळाने ‘मुक्तांगण मित्र’ या संस्थेमार्फत विद्यार्थी, पालक आणि इतर घटकांसाठी विशेष समुपदेशन सेवा सुरू केली आहे. यासाठी ९११२७०९११२ हा भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
​याशिवाय, केंद्र व राज्य शासनाच्या खालील अधिकृत हेल्पलाईनवरही समुपदेशन सेवा २४ तास उपलब्ध असेल:
​टेलीमानस हेल्पलाईन: १४४१६
​मनोदर्शन हेल्पलाईन: ८४४८४४०६३२
​३१५ समुपदेशकांची सेवा सज्ज
​राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) या कार्यालयामार्फत एकूण ३१५ समुपदेशकांची सेवा पुरवण्यात आली आहे. या सर्व समुपदेशकांचे मोबाईल क्रमांक आणि पत्ते महाराष्ट्र राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (Website) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा ताण न घेता या समुपदेशन सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button