स्थानिक प्रशासनाकडून धबधब्यांच्या ठिकाणी निर्बंध

यंदा मे महिन्यात सुरू झालेल्या पावसाचा जोर जून महिन्यातही कायम होता. त्यामुळे रत्नागिरी चिपळूण तालुक्यासह जिल्ह्यातील बहुसंख्य धबधबे प्रवाहित झाले असून, धरणेही भरून वाहू लागली आहेत. त्यामुळे पावसाळी पर्यटनाला चालना मिळाली आहे; मात्र अतिउत्‍साहाच्या भरात किंवा बेशिस्त वागण्यामुळे अनेकवेळा दुर्घटना घडतात. त्याला आळा घालण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून धबधब्यांच्या ठिकाणी निर्बंध घातले आहेत तर पाटबंधारे विभागाकडून धरणांवर सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे. धरण परिसरातील अतिसंवेदनशील व जीविताला धोका ठरेल, अशा भागात जाण्यास पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे.

चिपळूण तालुक्‍यातील पर्यटनस्थळे आणि एक किलोमीटर परिसरातील धबधब्यांच्या ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. तिथे जीवित व वित्तहानी होऊ नये तसेच सरकारी व खासगी मालमत्तेचे नुकसान होऊ नये, पर्यटकांची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राहावी यासाठी ही प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यात पेढे येथील सवतसडा, तिवरे, अकले, अडरे, कामथे घाट, परशुराम घाट आणि कुंभार्ली घाटासह तालुक्यातील अनेक ठिकाणी लहान-मोठे धबधबे पावसाळ्यात नैसर्गिक पद्धतीने तयार होतात. तसेच काही गावांमध्ये धरणे पूर्णक्षमतेने भरलेली आहेत. सांडव्यावरून पाणी वाहत आहे. तिथे आपसूकच धबधबे तयार होतात. तिवरे, अनारी गावात हे अनुभव मिळत आहे. हे धबधबे सध्या गैरकृत्यासाठी प्रसिद्ध आहेत. अनेकवेळा महाविद्यालयीन तरुण-तरुणी या धबधब्यावर पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी धाव घेतात. त्यांची स्थानिक ग्रामस्थांबरोबर वादावादीही होते. त्यामुळे त्या परिसरात अनुचित प्रकार टाळण्यासाठी योग्य त्या सूचना तालुका प्रशासनाकडून दिलेल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button