
फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्रे सोमवारपासून (ता. १२) उपलब्ध होणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्रे सोमवारपासून (ता. १२) उपलब्ध होणार आहेत. सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर सोमवारपासून उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी प्रकटनाद्वारे दिली आहे.www.mahahsscboard.in
बारावीच्या परीक्षेसाठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येत आहे. विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी परीक्षेची ऑनलाइन प्रवेशपत्रांची छायांकित प्रत काढून विद्यार्थ्यांना द्यायची आहे. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना देताना, त्यांच्याकडून कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेशपत्राची छायांकित प्रत काढून त्यावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांनी शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी, अशा सूचना राज्य मंडळाने दिल्या आहेत.
प्रवेशपत्रावरील छायाचित्र सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचे छायाचित्र चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे. तसेच, प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित शाळा, महाविद्यालयांनी पुन:श्च छायाकिंत प्रत काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यायचे आहे, असेही डॉ. माळी यांनी स्पष्ट केले आहे.
राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक :
परीक्षा : वेळापत्रक
लेखी परीक्षा (सर्वसाधारण, द्विलक्षी आणि व्यवसाय अभ्यासक्रम) : १० फेब्रुवारी ते १८ मार्च
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन, तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम परीक्षा : २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी




