
४८ तासांत स्मार्ट मीटर बसवा, नाहीतर.! महावितरणच्या ‘त्या’ मेसेजमुळे वीज ग्राहक कडाडले
स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेला वेग देत असताना महावितरणने ग्राहकांना पाठविलेल्या ‘४८ तासांच्या’ संदेशामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. जुने वीजमीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्याबाबत पाठविण्यात आलेल्या संदेशांमुळे अनेक ग्राहकांमध्ये संभ्रम, नाराजी आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे.ग्राहकांना विश्वासात न घेता निर्णय लादला जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.
महावितरणकडून पाठविण्यात आलेल्या संदेशात भारत सरकारच्या अधिसूचनेचा उल्लेख करत स्मार्ट मीटर बसविण्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र अनेक ग्राहकांच्या मते, हा संदेश केवळ माहितीपर नसून अल्प मुदतीत निर्णय स्वीकारण्याचा दबाव निर्माण करणारा वाटत आहे. विशेषतः सध्याचे मीटर व्यवस्थित कार्यरत असताना ते बदलण्याची एवढी घाई का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
स्मार्ट मीटरमुळे अचूक बिलिंग, वीज वापरावर नियंत्रण आणि तांत्रिक सुविधा मिळणार असल्याचा दावा महावितरणकडून केला जात आहे. मात्र काही भागांमध्ये स्मार्ट मीटरनंतर वाढीव बिलांच्या तक्रारी झाल्याचा दावा ग्राहकांकडून केला जात आहे. त्यामुळे या नव्या यंत्रणेवर अनेकांनी शंका व्यक्त केली आहे. ग्राहक संघटनांच्या मते, स्मार्ट मीटरबाबत व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे.त्याचे फायदे, तांत्रिक बाबी, डेटा व्यवस्थापन, भविष्यातील शुल्क आणि ग्राहकांचे अधिकार याबाबत सविस्तर माहिती दिली जावी. त्यानंतरच मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी करण्यात यावी. काही नागरिकांनी स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेला विरोध करण्याचा इशाराही दिला आहे. कोणत्याही बदलापूर्वी ग्राहकांचा विश्वास संपादन करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
स्मार्ट मीटर ही आधुनिक तंत्रज्ञानाकडे वाटचाल असल्याचा दावा महावितरण करत असले, तरी त्याच्या अंमलबजावणीच्या पद्धतीवरून निर्माण झालेला वाद आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. त्यामुळे महावितरणने पुढे येऊन ग्राहकांच्या शंकांचे निरसन करावे आणि प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.




