
“आज संरक्षित उद्या सुरक्षित”हवा प्रदूषणाबाबत जनजागृती कार्यक्रम
रत्नागिरी, दि. 7 ):- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने औद्योगिक वसाहत लोटे येथे “हवेचे वाढते प्रदूषण नियंत्रण व खबरदारी” या विषयावर नुकताच जनजागृती कार्यक्रम झाला.
कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील, पर्यावरण तज्ञ डॉ. सचिन पाटील, प्रदूषण मंडळ क्षेत्रीय अधिकारी चिपळूण उत्कर्ष शिनगारे हे उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना पर्यावरणीय प्रदूषणाची वाढती पातळी हवेची गुणवत्ता, कायदेशीर साक्षरता आणि समुदाय संरक्षण याबाबत जागरुकता वाढवणे, प्रोत्साहन देणे याबाबत मार्गदर्शन केले. जनजागृतीच्या माध्यमातून पर्यावरणीय कायदेशीर साक्षरता व जागृती विषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली.
विशेष वक्ते म्हणून सी.ई.टी.पी. इंडस्ट्रीज असोसिएशन लोटेचे प्रतिनिधी मोहन पाटील उपस्थित होते. त्यांनी प्रदूषणाबाबत अत्यंत सोप्या पध्दतीने औद्योगिक वसाहतीमधील कंपन्याना मुलभूत ज्ञान व त्यावरील उपाय इत्यादींची माहिती दिली.
हवेच्या खालावत चाललेल्या गुणवत्ता व त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांबाबत या कार्यक्रमात चर्चा करण्यात आली. लोटे परिसरातील ग्रामस्थांनी लोटे औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यामुळे संध्याकाळच्या वेळी वातावरणात सोडलेला धूर साठतो त्यामुळे लोकांना त्रास होतो ही तक्रार केली ,याबाबत प्रदूषण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी श्री. शिनगारे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.
कार्यक्रमाला ग्रामस्थ, औद्योगिक कंपन्यातील अधिकारी व कर्मचारी वर्ग, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका उपस्थित होते.




