
मंत्रिमंडळ बैठकीत २१ महत्त्वाचे निर्णय;
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून गंभीर आजारासाठी १० लाख मिळणार
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट (Cabinet) बैठक आज संपन्न झाली. आजच्या बैठकीत काही मुद्द्यांवरुन चांगलीच खडाजंगी झाल्याची माहिती आहे. मात्र, आजच्या बैठकीत 21 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये, सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत विविध प्रकारच्या 2400 आजारांसाठी मान्यता देण्यात आली असून 2399 आजारांसाठी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार होणार आहेत. तर, ज्या काही गंभीर आजारांसाठी अधिकचा खर्च होत आहे, त्यात 10 लाख रुपये देण्याचा निर्णयही शासनाने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मंत्रिमंडळ बैठकीत आज पुन्हा मंत्र्यांनी प्रशासनाला धारेवर धरले, अजूनही पीडित शेतकऱ्यांना हवी तशी आणि हव्या त्या वेगाने मदत दिली जात नसल्याने अनेक वरिष्ठ मंत्री नाराज असल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना आणि भाजपच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीत नाराजी व्यक्त केली. मागील कॅबिनेटमध्ये देखील अशीच नाराजी व्यक्त केल्याने मुख्यमंत्री यांनी प्रशासनाला खडसावले होते. मात्र, आजच्या कॅबिनेटमध्ये पुन्हा मदत पोहोचली नसल्याची तक्रार काही मंत्र्यांनी केली, फक्त मराठवाड्यात नाही तर कोकणात देखील भात पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे कोकणातील सेना-भाजपच्या मंत्र्यांनी सांगितले, तिथे देखील मदत देण्याचे प्रशासनाला निर्देश बैठकीत देण्यात आले आहेत.




