
प्रा. डॉ. आनंद आंबेकर रत्नागिरी भूषण पुरस्काराने सन्मानित
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील (स्वायत्त) प्राध्यापक व बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे विभाग प्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांना रत्नागिरी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पत्रकार मुझम्मील काझी यांच्या सहकार्यातून ठाणे येथे पत्रकार म्हणून कार्यरत असणारे सुहास खंडागळे, उदय गोताड यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण विकासासाठी पहिला कुणबी महोत्सव आयोजित केला होता. त्यानिमित्ताने डॉ. आंबेकर यांना रत्नागिरी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. आंबेकर गेली २६ वर्ष महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. समाजशास्त्र विषयांमध्ये एमए, एमफिल आणि पीएचडी केल्यानंतर काउन्सलिंग संदर्भात विशेष डिप्लोमा केला आहे. त्यामधून अनेक विद्यार्थी आणि इतर व्यवसायिकांना ते मार्गदर्शन करत असतात. त्याचबरोबर महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागामध्ये अनेक वर्ष कार्यरत आहेत. त्यांचे अनेक विद्यार्थी कलाक्षेत्रातील व्यावसायिक जीवनात यशस्वी आहेत. नवीन एज्युकेशन पॉलिसीनंतर इंटरप्रिनरशिप मॅनेजमेंट हा विषय शिकवत असताना ते व्यावसायिक नियोजनासंदर्भात मार्गदर्शन करत असतात.
मुंबई विद्यापीठ स्तरावर युवा महोत्सवामध्ये रत्नागिरी जिल्हा समन्वयक म्हणून गेली १८ वर्ष कार्यरत आहेत. मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास मॅनेजमेंट समितीमध्ये ते काम बघत आहेत. काही वर्षे ते बोर्ड ऑफ स्टुडन्ट डेव्हलपमेंट या कुलगुरूंना सहकार्य करणाऱ्या समितीमध्येही कार्यरत होते. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी कोणत्या योजना विद्यापीठ स्तरावर राबवल्या पाहिजेत याबद्दल त्यांनी विद्यापीठ स्तरावर काम केले आहे.
कला क्षेत्रामध्ये अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा रत्नागिरी याचे आजीव सभासद आणि कार्यकारणी सदस्य म्हणून काम करत आहेत. त्याचबरोबर कोकण मराठी साहित्य परिषदेत आजीव सभासद आणि कार्यकारणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत. पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेसाठी काही वर्षे कोकण समन्वयक म्हणून महाराष्ट्रीयन कला उपासक पुणे यांच्यासोबत काम केले आहे.
सामाजिक क्षेत्रात काम करत असताना श्री संवाद प्रतिष्ठानतर्फे अनेक उपक्रम राबवत असतात. महाराजा फाउंडेशनतर्फे गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये गेली २० वर्ष मॅनेजमेंट करंडक देऊन विद्यार्थ्यांमध्ये इव्हेंट मॅनेजमेंटचे कौशल्य विकसित व्हावे म्हणून सातत्याने काम करत आहेत. जय जीवदानी एक फॅमिली ग्रुप स्थापन करून गेली दहा वर्ष दर सहा महिन्याने चिंतन शिबिर घेऊन परिवारातील ४० सदस्यांना मानसिक, सामाजिक आणि आर्थिक सहकार्य देण्यासाठी विशेष फॅमिली संघटनेचे मॉडेल तयार केले आहे.
रत्नागिरी भूषण पुरस्कारावेळी डॉ. आनंद आंबेकर यांची पत्नी गौरी आंबेकर महाराजा परिवाराचे मित्र ॲड. सुजित कीर, सौ. शीतल कीर, राजेश जाधव, सौ. स्वाती जाधव, सचिन सावंत, सौ. सुरभी सावंत, संदेश कीर, सौ. हेमाली कीर उपस्थित होते.




