अपघातग्रस्तांना देवदूत ठरताहेत नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या रुग्णवाहिका

श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील जगद‍्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या सुरू असलेल्या रूग्णवाहिका सेवा उपक्रमाला आता एक तप पूर्ण झाले आहे. गेल्या 12 वर्षांत संस्थानच्या 27 रुग्णवाहिकांनी महामार्गावरील 8642 अपघातस्थळी जाऊन 17416 जणांना तातडीने  रुग्णालयात पोहोचवले आहे. त्यातून जखमींना वेळेत उपचार मिळून त्यांचे प्राण वाचण्यास मोठी मदत झाली आहे.
संस्थानच्या अनेक सामाजिक  उपक्रमांपैकी मोफत रुग्णवाहिका सेवा हा महत्वपूर्ण उपक्रम आहे. महामार्गांवरील अपघतग्रास्तांच्या मदतीसाठी त्या धावत आहेत. सध्या मुंबई- गोवा, मुंबई-अहमदाबाद, मुंबई-सोलापूर-हैदराबाद, मुंबई-आग्रा- पुणे-बंगलोर, रत्नागिरी-नागपूर अशा सहा महामार्गावर महाराष्ट्राच्या हद्दीत वेगवेगळ्या गावी संस्थानच्या 27 रूग्णवाहिका सध्या कार्यरत आहेत. सतत 24 तास त्या दक्ष असतात. तेथून त्या महामार्गाच्या टापूतील दोन्ही बाजूच्या 25-30 किलो मीटर परिसरातील   अपघातस्थळी दाखल होतात जखमींना तातडीने नजीकच्या दवाखान्यात पोहोचवतात. त्यातून एक तपाच्या कालावधीत एवढे मोठे जीवनदायी सामाजिक काम संस्थानने केले आहे.  
अशा प्रकारची मोफत रुग्णवाहिका सेवा अपघातग्रास्तांना उपयुक्त ठरेल अशी कल्पना जगद‍्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांना सुचली. आपल्या सततच्या दौर्‍यात त्यांच्या संवेदनशील मनाला जाणवले की, वाहनांची संख्या प्रचंड वाढत आहे. वाहनांचा वेगही अधिक वाढतो आहे. त्यामुळे सतत अपघात होत असतात. त्याची दखल लोक तातडीने घेत नाहीत. शेजारून वाहने धावत असतात पण अपघाताकडे वा तेथील जखमींकडे ते ढुंकूनदेखील बघत नाही. त्यामुळे अनेक जखमी जाग्यावरच विव्हळत असतात. अनेकांना केवळ वेळेत उपचार न मिळाल्याने प्राण गमवावे लागतात. यावरून स्वामीजींना रुग्णवाहिका सेवेची कल्पना सुचली.
या योजनेची सुरूवात  25 जुलै 2010 रोजी गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी झाली सुरुवातीला मुंबई-गोवा महामार्गावर रुग्णवाहिका सुरू करण्यात आली. त्याला मिळणारा प्रतिसाद, त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन वेळोवेळी रुग्णवाहिकांमध्ये वाढ करण्यात आली. आज अशा 27 रुग्णवाहिका समाजसेवेचा वसा घेऊन धावत आहेत. जखमींचे प्राण वाचविण्यासाठी धडपडत आहेत. गेले एक तप हे कार्य अखंड चालू आहे.
 मुंबई -गोवा महामार्गावर कशेडी घाट, संगमेश्वर, हातखंबा, राजापूर येथे रुग्णवाहिका आहेत. त्यांनी 1770 अपघातस्थळी जाऊन 4250 जखमींना रुग्णालयात पोहोचवले. मुंबई-आग्रा महामार्गावर कसारा घाट, गोंदे फाटा, शिरवाडे फाटा व मालेगाव येथील रुग्णवाहिकांनी 2639 अपघात अटेंड करून 5475 जखमींना रुग्णालयात पोहोचवले. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर  शिरसाड, तलसारी येथील रुग्णवाहिकांनी 1413 अपघातस्थळी धावून 2699 जखमींना रुग्णलायत दाखल केले आहे.  मुंबई-सोलापूर-हैदराबाद महामार्गावर यवत, भिगवण, इंदापूर, नळदुर्ग, उमरगा अशा पाच ठिकाणी रुग्णवाहिका आहेत. त्यांनी 1401 अपघातस्थळी जाऊन 2866 जखमींना रुग्णालयात नेले. पुणे-बंगरुळुरु महामार्गावर कापूरहोळ, पारगाव खंडाळा, लिंब फाटा, मसूरफाटा, वाघवाडी, वाठार अशा सहा ठिकाणी रुग्णवाहिका आहेत. त्यांनी 1345 अपघातस्थळी जाऊन 1978 जखमींना रुग्णालयात दाखल केले. रत्नागिरी-नागपूर महामार्गावर नाणीज, बांबवडे, सांगोला, मंगळवेढा अशा चार ठिकांणी रुग्णवाहिका आहेत. त्यांनी 74 अपघातस्थळी जाऊन 148 जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. अशातर्हेने 27 रुग्णवाहिकांनी 8642 अपघातस्थळी धावून जात 17,416 जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button