
झिरो ॲक्सिडेंट ड्राईव्हचा धडाका; आठ दिवसांत ७०० हून अधिक वाहनचालकांवर कारवाई
_____
रत्नागिरी : जिल्ह्यात वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने सुरू केलेल्या ‘झिरो ॲक्सिडेंट ड्राईव्ह’ मोहिमेअंतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू असून, अवघ्या आठ दिवसांत ७०० हून अधिक वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून १ जूनपासून ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. १ ते ८ जून या कालावधीत मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या तब्बल ४०१ चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच अतिवेगाने वाहन चालवणाऱ्या १७३ चालकांवर कारवाई करण्यात आली, तर रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी वाहने उभी करणाऱ्या १६२ वाहनधारकांनाही दंड ठोठावण्यात आला.
हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवरही पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात सातत्याने कारवाई सुरू आहे.
दरम्यान, केवळ दंडात्मक कारवाईवर भर न देता वाहतूक नियमांबाबत जनजागृतीसाठीही पोलीस प्रशासनाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. जिल्ह्यातील सर्व १८ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी रस्ता सुरक्षा अभियान राबवून नागरिकांना सुरक्षित वाहतुकीचे धडे दिले जात आहेत.
राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध विभागांच्या समन्वयातून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. हातखंबा व भोस्ते घाट यांसारख्या अपघातप्रवण ठिकाणी सूचना फलक, वेगमर्यादा दर्शक फलक आणि रंबलर्स बसविण्यात आले आहेत.
वाहतूक नियमांचे काटेकोर पालन, मद्यपान करून वाहन न चालवणे, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर आणि वेगमर्यादेचे पालन करणे, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. अपघातमुक्त रत्नागिरीच्या दिशेने ही मोहीम आगामी काळात आणखी व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.




