सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद पटकावले…


महेंद्रसिंग धोनी व रोहित शर्मा यांच्यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद पटकावले…
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जिंकलेल्या २०२४ च्या वर्ल्ड कपमुळे गतविजेता म्हणून भारत यंदा मैदानावर उतरला होता. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचे जेतेपद कायम राखणारा भारत हा जगातील पहिला संघ ठरला. शिवाय ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वाधिक ३ जेतेपदं ( २००७, २०२४ व २०२६) भारताच्या नावावर झाली आहेत. यजमान म्हणूनही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकणारा हा पहिला संघ ठरला. भारताच्या या विजयी प्रवासात संजू सॅमसन याचा सिंहाचा वाटा ठरला. आज भारतीय संघाने सर्व आघाड्यांवर उल्लेखनीय कामगिरी केली.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात संजू सॅमसन, इशान किशन व अभिषेक शर्मा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने ५ बाद २५५ धावांचा डोंगर उभा केला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप फायनलमधील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. अभिषेक व संजू यांनी पहिल्या विकेटसाठी ४३ चेंडूंत ९८ धावा जोडल्या. अभिषेकने २१ चेंडूंत ५२ धावा ( ६ चौकार व ३ षटकार) केल्या. त्यानंतर संजू व इशान यांनी ४८ चेंडूंत १०५ धावांची भागीदारी केली.

इशानने २५ चेंडूंत ५४ धावांची खेळी केली, तर संजूने ४६ चेंडूंत ५ चौकार व ८ षटकारांसह ८९ धावा कुटल्या. शिवम दुबेने ८ चेंडूंत नाबाद २६ धावा करून संघाला २५५ धावांपर्यंत पोहोचवले. भारताने शेवटच्या ५ षटकांत ५२ धावांत ४ विकेट्स गमावल्या. यापैकी २४ धावा या २०व्या षटकात आल्या. जिमी निशॅमने ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात पहिल्याच षटकात फिन अॅलनचा झेल शिवम दुबेने टाकला.. उत्तुंग उडालेला चेंडू टिपताना दुबेकडून चूक झाली. पण, मागील सामन्यातील शतकवीर फिनला ( ९) तिसऱ्या षटकात अक्षर पटेलने माघारी पाठवले.चौथ्या षटकात जसप्रीत बुमराहला गोलंदाजीला आणले गेले आणि त्याने पहिल्याच चेंडूवर रचिन रवींद्रला ( १) बाद केले. इशान किशनने अप्रतिम झेल टिपला. टीम सेइफर्टने दुसऱ्या षटकात हार्दिकच्या गोलंदाजीवर २१ धावा चोपल्या होत्या, परंतु या दोन विकेट्सने न्यूझीलंडवर दडपण निर्माण झाले. ‘बापू’ अक्षर पटेलने त्याच्या पुढच्या षटकात चतुराने चेंडूची दिशा बदलून ग्लेन फिलिप्सचा ( ५) त्रिफळा उडवला. न्यूझीलंडला पॉवर प्लेमध्ये ३ बाद ५१ धावाच करता आल्या.टीम सेइफर्टने २३ चेंडूंत अर्धशतक झळकावताना न्यूझीलंडकडून लढा सुरू ठेवला. हार्दिकच्या दुसऱ्या षटकात मार्क चॅपमन ( ३) त्रिफळाचीत झाला. चेंडू बॅटच्या आतल्या बाजूला लागून यष्टींवर आदळला. वरुण चक्रवर्थीच्या पहिल्या षटकात १६ धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकात सेइफर्टने षटकारासाठी चेंडू टोलवला होता. पण, इशान किशनने पुन्हा एकदा अप्रतिम झेल टिपला. सेइफर्ट २६ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह ५२ धावांवर बाद झाला आणि किवींचा निम्मा संघ ७२ धावांत परतला.

मिचेल सँटनर व डॅरिल मिचेल ही अनुभवी जोडी मैदानावर उभी राहिली, परंतु धावा व चेंडूंचे अंतर खूपच वाढलेले आणि किवींना १८च्या सरासरीने धावा करायच्या होत्या. डॅरिलने दोन षटकार खेचून दडपण कमी करण्याचा प्रयत्न केला, परंतु अर्शदीप सिंगने त्याच्या दिशेने मुद्दाम चेंडू फेकला. त्यामुळे डॅरिल थोडा चिडला आणि वातावरण तापले होते. अक्षर पटेलच्या चेंडूवर मिचेल सँटनरचा सोपा झेल हार्दिकने टाकला. डॅरिल व मिचेल यांनी अर्धशतकी भागीदारी केली. पण, अक्षरने विकेटसत्र सुरू ठेवले आणि डॅरिल मिचेलला ( १७) बाद केले. इशानने सोपा झेल टिपला.

३० चेंडूंत ११६ धावा असे अशक्य आव्हान न्यूझीलंडसमोर होते आणि जसप्रीत बुमराहने १६व्या षटकात नीशमला ( ८) त्रिफळाचीत केले आणि पुढच्याच चेंडूवर मॅट हेन्रीचा ( ०) त्रिफळा उडवून जसप्रीतने हॅटट्रिकची संधी निर्माण केली. आता विजयाची केवळ औपचारिकता राहिली होती. बुमराहने त्याच्या पुढच्या षटकात मिचेल सँटनरला ( ४३) बाद करून डावातील चौथी विकेट घेतली. जस्सीने १५ धावांत ४ विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ १५९ धावांत तंबूत परतला आणि भारताने ९६ धावांनी हा सामना जिंकला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button