
थालापती विजयच होणार तामिळनाडूचा नवा मुख्यमंत्री! बहुमताचं गणित जुळलं, ‘या’ तीन पक्षांनी पाठिंबा केला जाहीर
तामिळनाडूमध्ये अखेर थालापती विजयच्या टीव्हीके पक्षाचं सरकार येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. CPI, CPIM आणि VCK पक्षांनी टीव्हीकेला समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे.यासह टीव्हीकेने अखेर बहुमताचा आकडा गाठला आहे. CPI, CPIM आणि VCK यांच्या मिळून एकूण 6 जागा आहेत. याशिवाय काँग्रेसच्या 5 आमदारांनी पाठिंबा दिला आहे. यानंतर आता तामिळनाडूत टीव्हीकेचं सरकार येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर थालापती विजयचा टीव्हीके पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. मात्र बहुमतापासून 10 जागा दूर असल्याने सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला होता. पण अखेर हा पेच सुटला आहे.
तामिळनाडूत येणार टीव्हीकेचं सरकार
विजयच्या टीव्हीके पक्षाकडे सध्या 108 जागा आहेत. विजयचा दोन मतदारसंघांतून विजय झाला असल्याने त्याला एक मतदारसंघ सोडावा लागणार आहे. यामुळे ही संख्या 107 होणार आहे. काँग्रेस पक्षाच्या 5 आमदारांच्या पाठिंब्यामुळे, ही संख्या वाढून 112 होत आहे. CPI, CPM आणि VCK यांचे एकूण 6 आमदार आहेत. याशिवाय इंडियन युनिअन मुस्लिम लीग (2) आणि टीटीव्हीनेही (1) पाठिंबा दिला आहे. यानंतर ही संख्या 121 वर जात आहे. परिणामी, विजयचा मुख्यमंत्री होण्याचा मार्गही आता मोकळा झाला आहे.




