
पाचेरी सडा (गुहागर) येथील रुणय मालप याची जिल्हास्तरीय परीक्षेसाठी निवड
जिल्हा परिषदेतर्फे २०२५-२६ शैक्षणिक वर्षात घेतलेल्या “जाणू विज्ञान, अनुभवू विज्ञान” अंतर्गत “नासा”, “इस्त्रो” परीक्षेसाठी गुहागर तालुक्यातून सुमारे ३ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या विद्यार्थ्यांमधून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा पाचेरी सडा नं. १ या शाळेचा विद्यार्थी रुणय रंजित मालप याने पाचेरी आगर केंद्रात प्रथम क्रमांक, आबलोली बीटमध्ये १० वा क्रमांक, तर गुहागर तालुक्यात २१ वा क्रमांक पटकावला आहे. त्याची जिल्हास्तरावर परीक्षेसाठी निवड करण्यात आली आहे. रुणयने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याच्यावर पाचेरी सडा पंचक्रोशीतून अभिनंदनच वर्षाव होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.
रुणय याला मार्गदर्शक शिक्षक आनंद मुळे, मुख्याध्यापक संजय वाघ, सचिन लबडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. पाचेरी सडा शाळा नं.१, या शाळेची शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंदानी रुणय रंजित मालप याचे विशेष कौतुक केले.




