ऐन हिवाळ्यात रात्री कोल्हापूरात अवकाळी पावसाची हजेरी


ऐन हिवाळ्यात रात्री कोल्हापूरला अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक सरीवर सरी कोसळल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मग्न झालेल्या नेते, कार्यकर्त्यांची धावपळ झाली.ऐन थंडीत हवामान खात्याने राज्यात तुरळक स्वरूपात अवकाळी पावसाचा अंदाज दिला होता. श्रीलंका आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने शहर परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. त्यामुळे थंडीचे प्रमाण काहीसे कमी झाल्याचे जाणविले. रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक अवकाळी पाऊस सुरू झाला.

प्रारंभी रिमझिम पावसाने मातीचा सुगंध दरवळला. काही क्षणांनी पाऊस थांबेल, अशी शक्यता फोल ठरली. त्यामुळे नोकरदार, रस्त्यांवरील विक्रेते, व्यावसायिक, नागरिकांची तारांबळ उडाली. दुचाकी वाहनधारकांनी पेट्रोलपंप, बसस्टॉपचा आधार घेतला. काहींनी पावसाच्या सरी अंगावर झेलत घर गाठले.

महापालिका निवडणुकीतील प्रचार शिगेला पोहोचला असताना पावसाने हजेरी लावल्याने पदयात्रा, प्रचाराची जाहीर सभेच्या ठिकाणी नेते, कार्यकर्त्यांची धावपळ झाली. त्यांना वेळ संपण्यापूर्वी प्रचार आटोपता घ्यावा लागला. सुमारे पाऊण तास पावसाची रिपरिप सुरू राहिली. काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याने अंधार होता. दरम्यान, पुन्हा अशा स्वरूपातील पाऊस झाल्यास रब्बी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. ऊस तोडणीला देखील फटका बसण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button