
पर्यावरणपूरक उपक्रमांच्या दिशेने रत्नागिरी नगर परिषदेचे पाऊल, १० चे नाणे टाका.. कापडी पिशवी मिळवा
पर्यावरणपूरक उपक्रमांच्या दिशेने रत्नागिरी नगर परिषदेने एक अभिनव पाऊल टाकले आहे. शहराच्या मच्छि मार्केटमध्ये आता नागरिकांना फक्त १० रुपयांत कापडी पिशवी मिळेल अशा व्हेंडींग मशीनची सुविधा सुरू करण्यात आली आहे. हा उपक्रम नगर परिषदेच्या स्वच्छ आणि सुंदर रत्नागिरी मोहिमेचा भाग आहे.
या मशीनमध्ये नागरिकांना फक्त दहा रुपयांचे नाणे टाकावे लागते आणि लगेचच कापडी पिशवी मिळते. नागरिकांना मशीनमध्ये पिशव्यांचा पुरेसा स्टॉक आहे की नाही, हे पाहूनच याचा वापर करावा लागेल. ही सोय सोपी, जलद आणि किफायतशीर असल्यामुळे नागरिकांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यास प्रोत्साहन मिळणार आहे.
नगर परिषदेचे अधिकारी म्हणतात, हे फक्त कापडी पिशवी देण्याचे मशीन नाही, तर पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक महत्वपूर्ण उपक्रम आहे. नागरिकांनी याचा उत्स्फूर्तपणे उपयोग करून शहर स्वच्छ ठेवण्यास मदत करावी, या अभिनव उपक्रमाचे स्थानिक नागरिक आणि व्यापारी दोघेही कौतूक करत आहेत.
www.konkantoday.com




