बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदारांमध्ये तीव्र चिंता


कोकणात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट घोंगावत असून, बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदारांमध्ये तीव्र चिंता निर्माण झाली आहे. सध्या प्रत्यक्ष पावसाची नोंद नसली, तरी ढगाळ वातावरण, वाढलेली आर्द्रता आणि मळभ यामुळे अवकाळी पावसाचे संकेत मिळत आहेत. या परिस्थितीचा थेट फटका हातातोंडाशी आलेल्या आंबा व काजू उत्पादनाला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ६८ हजार ५५० हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड केली जाते. मागील वर्षी जिल्ह्यातून सुमारे १८ लाख ४ हजार ६०२ मेट्रिक टन उत्पादन घेण्यात आले होते. आंब्याची सरासरी उत्पादकता सुमारे ३ टन इतकी होती. त्याचप्रमाणे जिल्ह्यात काजू लागवड मोठ्या प्रमाणावर होत असून, सुमारे १ लाख १२ हजार ५५७ हेक्टर क्षेत्रातून १ लाख ४२ हजार २० मेट्रिक टन उत्पादन मिळाले होते. काजूची उत्पादकता सुमारे १.५ टन इतकी होती.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा उत्पादनात वाढ होईल, अशी आशा बागायतदारांना होती. यंदाच्या हिवाळ्यात थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे आंबा आणि काजू झाडांना चांगला मोहर आला होता. हा मोहर टिकवून ठेवण्यासाठी बागायतदारांनी लाखो रुपयांचा खर्च करून औषध फवारण्या केल्या आहेत. मात्र सध्या निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे हा मोहर गळून पडण्याची भीती वाढली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button