दीप अमावस्येच्या प्रदर्शनाचा परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना शाळेने पाठवला व्हिडिओ

आषाढ अमावस्या तथा दीप अमावस्येचे औचित्य साधून येथील परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरात दरवर्षी प्राचीन काळापासूनच्या दिव्यांचे प्रदर्शन मांडण्यात येते.आज दीप अमावस्या आहे पण कोरोनामुळे शाळा बंद आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांतील प्रदर्शनाचा आढावा घेत एक सुरेख व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांना शाळेने पाठवला आहे. विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास पाठवून ज्ञानाची ज्योत तेवत ठेवली आहे. बुद्धीतील दिवा प्रज्वलित होवो आणि शास्त्रज्ञाना कोरोनावर लस मिळो आणि जग कोरोनामुक्त होवो, अशी प्रार्थना दिव्याजवळ केली आहे.

प्रत्येक अमावस्या आपल्याला वेगळेपण शिकवते. अमावस्या झाली की दुसर्‍या दिवसापासून पुन्हा प्रकाशाची वाट चालायला सुरवात होते. त्यानुसार दीप अमावस्येनंतर कोरोना संकटातून बाहेर पडायला मार्ग मिळावा. दुष्ट प्रवृत्ती आहेत त्या नष्ट होऊन सगळ्यांना चांगली बुद्धी मिळो, अशी प्रार्थना शाळेने या व्हिडिओतून केली आहे. कोरोनामुळे घरी राहा सुरक्षित राहा असा संदेशही यातून देण्यात आला आहे.

दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब परुळेकर आणि संचालक सौ. विशाखा भिडे, कार्याध्यक्ष अ‍ॅड. सुमिता भावे, सचिव सौ. दाक्षायणी बोपर्डीकर यांच्या संकल्पनेतून दहा वर्षे हा उपक्रम राबवला जात आहे. विद्यार्थी घरी असले तरी या कार्यक्रमाचा वास्तवदर्शी अनुभव विद्यार्थी आणि पालकांना घेता यावा, यासाठी मागील वर्षांच्या कार्यक्रमांचा व्हिडिओ करून तो विद्यार्थ्यांच्या व्हाट्सअप ग्रुपवर पाठवला आहे. या व्हिडिओची निर्मिती माजी विद्यार्थी राज नारकर आणि मुख्याध्यापक विनोद नारकर यांनी केली आहे. त्यासाठी व्यवस्थापक दिलीप भातडे यांचे मार्गदर्शन लाभले.

कोविड 19 विलगीकरण केंद्रात संस्थेच्या शाळांतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सेवा देत राष्ट्रीय कर्तव्य बजावत आहेत. जनतेनेही शासकीय नियम पाळून, मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर राखून सहकार्य करावे, असे आवाहन शाळा व संस्थेने केले आहे.

प्रदर्शनात असतात अनेक प्रकारचे दिवे

प्रकाशाचे स्रोत असणार्‍या दिव्यांचे महत्त्व आणि त्यांचे प्रकार विद्यार्थ्यांना कळण्यासाठी अभ्यंकर विद्यामंदिरात दरवर्षी दिव्यांचे प्रदर्शन भरवले जाते. यात गारगोटीचे दगड आणि त्रिपूर, समई, निरांजन, दगडी, मातीचे दिवे, तेलाचे दिवे, कुरवंडीचा दिवा, मेणबत्ती, बत्ती, कंदील, आधुनिक काळातील सौरऊर्जेवर चालणार्‍या विविध दिव्यांचा प्रदर्शनात समावेश असतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button