
राजापूर मध्ये युवतीचा विनयभंग,पोलिस स्थानकात तक्रार दाखल
राजापूर २६:- राजापूर तालुक्यातील एका तरुणीच्या मोबाईलवर विनयभंग करणारे संदेश व कॉल केल्याप्रकरणी एका ४५ वर्षीय व्यक्तीविरुद्ध सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना गुरुवार, दिनांक २५ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने वारंवार व्हॉट्सपवरून अनुचित संदेश पाठवून तरुणीच्या विनयशीलतेचा भंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी बी.एन.एस. कलम 78 (2) व 79 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या घटनेनंतर परिसरातील महिला संघटना सरसावल्या असून, आरोपीवर तात्काळ व कठोर कारवाई व्हावी यासाठी त्या महिला पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार आहेत. महिला कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, महिलांच्या सुरक्षिततेशी संबंधित अशा गंभीर प्रकरणात कोणतीही विलंब न करता कारवाई होणे आवश्यक आहे.
या संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले की, “महिला संदर्भातील गुन्ह्यांमध्ये पोलिस कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत. आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल आणि हा खटला लवकरात लवकर फास्ट-ट्रॅकवर चालवण्यासाठी प्रयत्न केले जातील.”




