
दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर मध्यरात्री ट्रकला धडकल्यानंतर पेटली बस, ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू; २२ जण जखमी
दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर राजस्थानच्या दौसा इथं मध्यरात्री अडीचच्या सुमारास भीषण अपघात झाला. हरिद्वारहून इंदौरच्या दिशेनं निघालेल्या प्रवाशांच्या बसची ट्रकला धडक बसली. यानंतर लागलेल्या आगीत होरपळून ७ प्रवाशांचा मृत्यू झाला तर २२ जण जखमी झाले आहेत.बसमधून एकूण ३७ प्रवाशी प्रवास करत होते असं सांगण्यात येत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कोलवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खासगी बस अनियंत्रित होऊन एका ट्रकला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की काही क्षणात बसला आग लागली. आगीत बसचा मोठा भाग जळून खाक झाला. अपघातावेळी बसमध्ये ३७ जण होते. यापैकी ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला तर इतर प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपघात रेस्ट एरियाजवळ झाला. सुरुवातीला २ मृत्यू आणि १७ जण जखमी झाल्याची माहिती होती. मात्र रुग्णालयात जखमींना दाखल केल्यानंतर त्यापैकी आणखी काहींचा मृत्यू झाला. सध्या मृतांचा आकडा ७ वर पोहोचला असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं.




