
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आता वाचन संस्कृती वाढवा कुवारबाव जेष्ठ नागरिक संघात प्राचार्य दत्ता पवार यांचे आवाहन
रत्नागिरी प्रतिनिधी* : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आता ज्येष्ठ नागरिकांनीही शालेय विद्यार्थी आणि आपल्या नातवंडांपर्यंत वाचन संस्कृती निर्माण करण्याचे प्रयत्न करावेत. कुवारबाव संघात सुरू केलेल्या संतश्रेष्ठ श्री गाडगेबाबा वाचन कक्षामार्फत ग्रंथालय चळवळीचा प्रसार करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन माजी प्राचार्य दत्ता पवार यांनी कुवारबाव परिसर नागरिक संघाच्या मासिक स्नेह मेळाव्यात मार्गदर्शन करताना केले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष श्री मारुती अंबरे हे होते.निवृत्त प्राचार्य दत्ता पवार यांनी ग्रंथालय चळवळ आणि ज्येष्ठांची जबाबदारी याविषयी “चिंतन” या सदरात मराठी साहित्य हे आपले टॉनिक असल्याचे स्पष्ट केले. तर संघाचे पदसिद्ध मार्गदर्शक श्री. श्याम सुंदर सावंत देसाई यांनी ग्रंथालय चळवळ गतिमान करताना “गाव तेथे ज्येष्ठ नागरिक संघ” ही फेसकॉम ची संकल्पना कृतीत आणण्याची गरज प्रतिपादन केली.यावेळी सर्वश्री प्रतीक्षा भिसे आणि श्री. रुपेश साळवी यांनी आरोग्य संपन्न भारत मिशन चळवळीची माहिती देताना ज्येष्ठांना जुनाट व्याधी कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधांची उपयुक्तता पटवून दिली. मेळाव्यात ऑक्टोबर महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचा शुभेच्छा पत्र आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. उपाध्यक्ष श्री. राजेंद्र कदम यांनी त्यांना शुभेच्छा देऊन आभार प्रदर्शन केले. मेळाव्याच्या संयोजनात कार्यकारणी सदस्य श्री. प्रकाशराव शिंदे, श्री. मुकुंद जोशी, श्री. सुरेश शेलार तसेच महिला प्रतिनिधी सौ. शुभांगी भावे, सौ. सुवर्णा चव्हाण, श्रीमती वृषाली घाणेकर, श्रीमती वंदना कोतवडेकर, आदींनी सहकार्य केले. शेवटी पसायदानाने मेळाव्याची सांगता करण्यात आली.