
राजापूर आगाराच्या वतीने ‘एसटी संगे मार्लेश्वर व कुणकेश्वर विशेष दर्शन यात्रे’चे आयोजन
श्रावण महिन्याचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राजापूर आगाराच्या वतीने ‘एसटी संगे मार्लेश्वर व कुणकेश्वर विशेष दर्शन यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे.श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी ही विशेष दर्शन यात्रा होणार आहे. एसटी आगाराकाडून आयोजित केलेल्या या विशेष दर्शन यात्रेमुळे तालुकाविसायांना श्रावण सोमवारी श्री मालेश्वर, श्री कुणकेश्वर यांच्यासह अन्य देवदेवतांचे दर्शन घेण्याची सुवर्णसंधी लाभणार आहे. राजापूर एसटी आगारातर्फे प्रवासी वाढविणे आणि प्रवाशांना एसटीसोबत जोडण्याच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविले जात आहे. त्यातून, श्रावण महिन्याचे औचित्य साधून विशेष दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले. राजापूर ते मार्लेश्वर ही यात्रा राजापूर वाटूळ – भांबेड मार्गे मार्लेश्वर, बावनदी मार्गेनिवळी गणपतीपुळे मंदिर, आरेवारे मार्गे पावस श्री स्वामी स्वरूपानंद मठ दर्शन, आडिवरे श्री महाकाली मंदिर दर्शन राजापूर असा प्रवासाचा मार्ग राहणार आहे. कुणकेश्वर दर्शन यात्रेसाठी राजापूर कात्रादेवी वाडी- कुणकेश्वर मंदिर कोंडामा प्रतिबाळूमामा मंदिर, खारेपाटण श्री अदिष्ठी देवी मंदिर आणि श्री कालभैरव मंदिर राजापूर असा प्रवासाचा मार्ग असणार आहे. या विशेष दर्शन यात्रेचा जास्तीत जास्त प्रवाशांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक राहुल मलुष्टे यांनी केले आहे.