
आपत्ती काळात मदतीसाठी आणलेली फायबरची बोट भंगार अवस्थेत नागरिकांच्यात नाराजी
चिपळूण ः शहरात मुसळधार पाऊस पडल्यास शहरात पाणी भरते. अशा वेळी बोट किंवा फायबरच्या होडीचा वापर केला जातो. यासाठी येथे अल्पबचत भवनच्या मागे ठेवण्यात आलेल्या बोटीची दुरावस्था झाली असून माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी या बोटीला हार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली आहे.
चिपळूणमध्ये दरवर्षी पाणी भरते. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र परिसरात पाणी भरते. यासाठी येथे शासनाच्या बोटी ठेवलेल्या सज्ज असतात. गेले दोन वर्ष या बोटी कुठे दृष्टीस पडत नाहीत. अशीच एक दुरावस्था झालेली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नावाची बोट प्रांत कार्यालयाजवळ असलेल्या अल्पबचत भवनाच्या मागील बाजूस अखेरच्या घटका मोजत आहे. या बोटीला इंजिनही नाही. ही बोट काय व्यवस्थापन करणार असा प्रश्न उपस्थित करून माजी सभापती मुकादम यांनी या बोटीला पुष्पहार घालून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.