
तारकर्ली-वरचीवाडी (ता. मालवण) येथे पाच कोटी सात लाख रुपयाची व्हेल माशाची उलटी जप्त
सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तारकर्ली-वरचीवाडी (ता. मालवण) येथे सापळा रचून घराच्या बाजूला लपवून ठेवलेली तब्बल पाच किलो ७० ग्रॅमची व्हेल माशाची उलटी जप्त केली.आंतरराष्ट्रीय बाजार दराप्रमाणे याची किंमत पाच कोटी सात लाख रुपये एवढी असल्याचे स्पष्ट झाले आहे. तारकर्ली-वरचीवाडीत व्हेल माशाची उलटी (अंबर ग्रीस) विक्रीसाठी आणून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मंगळवारी मिळाली. त्याची खात्री करून कारवाईचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तारकर्ली-वरचीवाडी येथे सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्या घराच्या बाजूला लपवून ठेवलेली उलटी जप्त केली. याप्रकरणी आणखी एका संशयिताचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दोघांविरोधात मालवण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. www.konkantoday.com