कोणताही उद्योग हवा असेल तर समर्थनार्थ रस्त्यावर उतरले पाहिजे : ना. उदय सामंत

रत्नागिरी : रिफायनरी किंवा कोणताही उद्योग हवा असेल तर मनापासून समर्थनार्थ रस्त्यावर उतरले पाहिजे, अशी भूमिका राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्‍त केली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चर या संस्थेच्या रत्नागिरी जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त अंबर हॉल येथे आयोजित कोकण उद्योग मंथन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, ट्रस्ट बोर्ड अध्यक्ष आशिष पेडणेकर, पर्यटन समिती अध्यक्ष आर्किटेक्ट संतोष तावडे आदींसह जिल्ह्यातील मान्यवर उद्योजक व्यासपीठावर उपस्थित होते.
ना. सामंत म्हणाले,  उद्योग यायचे असतील तर फक्त मंथन परिषदा न घेता रस्त्यावर उतरून माहिती सांगितली पाहिजे. रत्नागिरीत उद्योग पाहिजेत म्हणणारे फक्त सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. उद्योगाला विरोध करणारे रस्त्यावर उतरत आहेत. समर्थनासाठीसुद्धा रस्त्यावर उतरले पाहिजे. उद्योग येण्याकरिता त्यांना फक्त इन्सेंटिव्ह देऊन नाही तर स्थानिक लोकांची सुद्धा मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. चेंबर्सनी उद्योजक बनवण्यासाठी असे कार्यक्रम केले पाहिजेत.
यावेळी ना. सामंत पुढे म्हणाले, लोटे, रत्नागिरी एमआयडीसीमध्ये अनेक प्रकल्प बंद आहेत, याचा अभ्यास करायला हवा आहे. उद्योग बंद करण्याची मालकाची मानसिकता का होते. स्थानिक, राज्य व केंद्र पातळीवरील काही कारणे असतील तर उद्योग विभागाने उत्तर शोधले पाहिजे. असे झाले तर वेदांतापेक्षाही जास्त रोजगार महाराष्ट्रात उपलब्ध होतील. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून उद्योग मंत्री म्हणून माझ्यावर, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर आरोप करण्यात आले. आरोप- प्रत्यारोप झाले. मी आज आपणास सांगतो 21 जानेवारी 2022 ला वेदांताने केंद्र व राज्याकडे अर्ज केला. त्यानंतर हाय पॉवर मीटिंग व्हायला हवी होती. परंतु सात महिन्यात ही बैठक झाली नाही. परंतु मी मंत्री झाल्यानंतर आम्ही पंधरा दिवसात बैठक लावली. गुजरातने 29 हजार कोटीचे पॅकेज दिले होते. आम्ही 39 हजार कोटीचे पॅकेज दिले. परंतु मालक अनिल अगरवाल यांनी सांगितले हाय पॉवर मिटींग घेतली नाही व सीएसआर मागितला. या राजकारणामुळे उद्योजक येत नाहीत. त्यामुळे वेदांत फॉक्सकॉनने हा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचे ठरवले.
रत्नागिरी जिल्ह्यासाठी मरीन पार्क, मँगो पार्क, लॉजिस्टिक पार्क दोन दिवसात मंजूर केला. पण आमच्याकडे जमिनीचा प्रश्न आहे. 1992 मध्ये रत्नागिरीत अनिल अगरवाल यांच्या स्टरलाईटने रत्नागिरीत साडेसहाशे एकर जागा संपादन केली. रत्नागिरीकरांनी उठाव केला. तो राग धरून अगरवाल ही जागा सोडायला तयार नाहीत. दि. 12 ऑक्टोबरला उच्च न्यायालयात तारीख आहे. गेल्या साडेसात वर्षांत तारीख लागली नाही, वकील देऊ शकलो नाही. हा नाकर्तेपणा आहे. 35 वर्षे उद्योग न करता अशा जागा अडवून ठेवल्या तर स्थानिकांनी करायचे काय, हे आम्ही न्यायालयात पटवून देत आहोत. 12 किंवा 13 ला जिल्हा न्यायालयाचा निकाल कायम होण्याची शक्यता आहे. आम्ही सर्व कागदपत्रे देत आहोत. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जायचीही तयारी केली आहे. उद्योग विभागाकडे ही जागा आली की, पुढील सहा महिन्यात या साडेसहाशे एकर जागेवर प्रदूषण विरहित कारखाना आणू, अशी ग्वाही सामंत यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button