कोसुंब येथे चिरेखाणीत आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह

देवरूख : नजीकच्या कोसुंब येथील आडवा मारुती बस थांबा जवळील जुन्या चिरेखाणीमध्ये रविवारी अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. मात्र मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. याबाबत देवरुख पोलिसांकडून आणि घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोसुंब येथे काम करणाऱ्या कामगारांना येथील जुन्या चिरेखाणीत मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यानंतर याची माहिती पोलीस पाटील यांनी देवरुख पोलीस स्थानकात दिली. देवरूख पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी राजू काकडे हेल्प अकॅडमीच्या कार्यकर्त्यांनी त्या चिरेखाणीत उतरून तो पुरुष जातीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढला. मिळून आलेला अज्ञात मृत तरुणाने जीन्स पँट परिधान केली होती, पायात पांढऱ्या रंगाचे बुट असून त्याने हातमोजे घातलेले होते. हा तरुण सुमारे तीस ते पस्तीस वर्षाचा असल्याचा अंदाज आहे. देवरुख पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव, हे. काँ. डी. एस. पवार, जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी पोलीस पाटील पांडुरंग खाके, कोसुंब गावचे तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र जाधव, आबा जाधव उपस्थित होते. मृतदेहाचे शवविच्छेदन संगमेश्वर ग्रामीण रुग्णालय येथे रात्री उशिरा करण्यात आले. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button