
राष्ट्रीय सेवा समिती, रत्नागिरी संचालित, रत्नागिरी येथील विद्यार्थिनी वसतिगृह नूतन वास्तू भूमी पूजन व पायाभरणी कार्यक्रम संपन्न
रत्नागिरी– राष्ट्रीय सेवा समिती रत्नागिरी मागील ३२ वर्षे रत्नागिरी जिल्ह्यात विविध सेवा कार्यांच्या माध्यमातून कार्यरत आहे. गोळवली संगमेश्वर येथील ग्रामविकास व गोसंवर्धन प्रकल्प, झाडगाव रत्नागिरी येथील आदर्श विद्यार्थी वसतिगृह, झाडगाव येथील योग प्रशिक्षण केंद्र अशा विविध उपक्रमातून समाजाच्या गरजा लक्षात घेत संस्थेचं कार्य सुरू आहे.
संस्थेच्या महिला सक्षमीकरण उपक्रमा अंतर्गत मागील काही वर्षांपासून सन्मित्र नगर रत्नागिरी येथे संस्थेचं विद्यार्थिनी वसतिगृह सुरू आहे.
बदलत्या काळानुरूप वाढत्या गरजा लक्षात घेत विद्यार्थीनींसाठी सुसज्ज व सेल्फ कंटेंड १८ कक्ष, तसेच सभागृह असणारं वसतिगृह उभारण्याचे संस्थेने निश्चित केले आहे.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, तसेच महावीर जयंती या शुभदिनी कोकण प्रांत सहसंघाचालक अर्जुन तथा बाबा चांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजित नूतन वस्तूचा भूमिपूजन व पायाभरणी चा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी श्री चांदेकर यांनी महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने समाजातील गरजा लक्षात घेत कार्यरत राहण्याविषयी मार्गदर्शन केले. तसेच या वसतिगृहाच्या माध्यमातून भविष्यात समाजोपयोगी कार्य करण्यास सक्षम विद्यार्थिनी तयार होऊन बाहेर पडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी यांनी, संस्थेचे आजवर सुरू असलेल्या कामाची तसेच त्यात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींची माहिती दिली आणि येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत संस्थेची वस्तू विद्यार्थिनी निवासासाठी पूर्ण करण्याचा मनोदय व्यक्त केला.
या मंगल प्रसंगी, विभाग कार्यवाह प्रसाद आगवेकर, माजी आमदार बाळ माने, प्रभागाचे नगरसेवक निमेश नायर, फिनोलेक्स कंपनीचे श्री. काकडे, श्री.चिवटे, मुन्ना सुर्वे, वसतिगृहासाठी जमीन देणगी देणारे विठ्ठल लिमये, विजय लिमये कुटुंबीय, राष्ट्रीय सेवा समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच संघ परिवारातील हितैशी उपस्थित होते