कोरोनाची भिती पाठीवर घेत बाप्पाच्या स्वागतासाठी कोकण सज्ज

गेले दीड वर्षे ठाण मांडून बसलेल्या कोरोनाची भीती पाठीवर घेत कोकणी जनता आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागताला सज्ज झाली आहे. कोरोनामुळे सर्वसामान्यांची आर्थिक घडी बिघडली असली तरी बाप्पाच्या स्वागतामध्ये कोणतीही कमी राहणार नाही याची खबरदारी भक्तांकडून घेतली जात आहे. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यावर निर्बंध असल्याने सार्वजनिक उत्सव मंडळांचा काहीसा हिरमोड झाला आहे. मात्र तरीही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कोरोना निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याची तयारी केली आहे.
पूर्वी गणेशोत्सव हा सण साजरा करण्यामध्ये एक वेगळाच उत्साह भरलेला असे. ढोल ताशाचा गजर आणि गुलालाची उधळण करत गणरायांचे आगमन होत असे. गणेश आगमनाच्या दिवशी दिवसभर वातावरणात एक वेगळाच भक्तिमय नाद भरलेला असे. गणरायांचे आगामी झाल्यावर शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा करून गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली जात असे. त्यानंतर आरतीचा गजर सुरु होई आणि सारे वातावरण गणेशमय होऊन जाई. जिकडे तिकडे गणरायांचे गुणगान वर्णन करणाऱ्या ध्वनिफिती ऐकू येत असत. ग्रामीण भागातही गणपती बाप्पा मोरया च्या गजराने परिसर निनादून जात असे.
मात्र मार्च २०२० मध्ये कोरोना महामारीचे संकट आले आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवावर कडक निर्बंध आले. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सामाजिक अंतर पाळण्याची अट आली त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना गर्दी न होऊ देण्याचे निर्बंध मंडळांवर घालण्यात आले. गणेशोत्सव हा सण गर्दीशिवाय साजरा होणेच शक्य नसल्याने साहजिकच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उत्साहावर पाणी फेरले गेले.
गतवर्षी गणेशोत्सवादरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्याने गतवर्षी गणेशोत्सवात कडक निर्बंध लादण्यात आले होते. मुंबईस्थित चाकरमान्यांना आपल्या गावीही येता आले नव्हते. मात्र या वर्षी निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता आहे त्यामुळे कोरोनाची भीती पाठीवर घेते गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.
यावर्षी गणेशोत्सवासाठी शेकडो चाकरमानी पुणे, मुंबई येथून कोकणात दाखल झाले आहेत. त्यामुळे बाजापेठांमध्ये खरेदीसाठीही गर्दी झाल्याचे पाहावयास मिळत आहे. गणरायांच्या आरासासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी आरशाचे साहित्य विकणाऱ्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांची गर्दी झालेली पहावयास मिळत आहे.
मुंबई पुणे येथील चाकरमानी खासगी किंवा भाड्याच्या वाहनाने गावी येऊ लागले असल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झालेली पाहावयास मिळत आहे. महामार्गाची दुरावस्था झाली असल्याने गावी येणाऱ्या भक्तांचा प्रवास रटाळ आणि आदळत आपटत होत आहे मात्र लाडक्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्याची आस लागलेले चाकरमानी वाटेत होणार त्रास सहन करत आपापल्या गावी पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरणयांचे स्वागत करण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी ठिकठिकाणी आपले चेकपोस्ट उभे केले आहेत. या ठिकाणी महार्गावरील वाहने थांबवून चालकाला पोलिसांकडून चहा आणि बिस्कीट दिले जात आहे. शिवाय खड्डेमय रस्त्यावरून वाहने हाकताना खबरदारी घेण्याच्या सूचनाही पोलिसांकडून केल्या जात आहेत.
कोरोनाची भीती अद्याप पूर्ण संपलेली नाही. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा करण्याच्या सूचना शासनाने भक्तांना केल्या आहेत. मात्र विघ्नहर्ता गणराया या महामारीचा बिमोड करेल हा विश्वास भक्तांमध्ये असल्याने कोरोनाची भीती पाठीवर घेत कोकणवासीय गणरायाच्या स्वागताला सज्ज झाले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button