सांडपाण्याप्रश्नी योग्य तोडगा न निघाल्यास संदीप फडकले यांचा आंदोलनाचा इशारा

खेड : लोटे औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्याप्रश्नी योग्य तोडगा निघाला नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रदूषण रोखण्याची जबाबदारी असणाऱ्या यंत्रणांनी वेळीच दखल घ्यावी अन्यथा जनतेचा क्षोभाला तयार रहावे असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष संदीप फडकले यांनी दिला आहे.
रासायनिक सांडपाणी थेट दाभोळ खाडीत सोडले जात असल्याने जलप्रदूषण होऊन मासेमारीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. मासेमारी हेच उदरनिर्वाहाचे साधन असणाऱ्या भोई समाज बांधवांची उपासमार होऊ लागली आहे. मात्र कारखानदार किंवा प्रदूषण रोखण्याची जबाबदारी असणाऱ्या यंत्रणांना त्याचे काहीही सोयर सुतक राहिलेले नाही. भोई समाजाची होत असलेली ससेहोलपट आता सहन करण्यापलीकडे गेली आहे.
कोकणचा सर्वाँगिणक विकास हा लोटे औदिगिक वसाहतीचा मूळ उद्देश होता मात्र या वसाहतीच्या प्रदूषणामुळे कोकणचा विकास होण्याऐवजी कोकण भकास होऊ लागला आहे. जलप्रदूषणामुळे मासेमारी धोक्यात आली आहे. तर वायू प्रदुषणामुळे आंबा, काजू या नगदी पिकांसह भातशेतीची पुरती वाट लागली आहे.
कोकणच्या मुळावर उठलेले प्रदूषण रोखण्यासाठी गेली अनेक वर्ष स्थानिक जनता लढा देते आहे मात्र मुजोर कारखानदार प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून जनतेचे आंदोलन चिरडून टाकत आहेत. औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा यासाठी आतापर्यन्त विविध प्रकारची आंदोलने छेडण्यात आली. रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला टाळे ठोकण्यात आले. मात्र यातून फारसे काही निष्पन्न झालेले नाही.
दाभोळ नदीचे पाणी दूषित होऊन मासे मेले की येतील मच्छिमार उपोषणासारखे आंदोलन करतात. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रदूषणामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीबाबत घसा फोडतात. मात्र कारखानदारांची पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यांपर्यंत त्यांचा आवाज पोचतच नाही. मात्र आता हे सारे सहन करण्याच्या पलीकडे गेले आहे. आता आर या पार ची लढाई करण्याच्या निर्णयाप्रत येथील मच्छिमार आणि प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेली जनता आली आहे. प्रदूषण रोखण्याची जबाबदारी असणाऱ्या यंत्रणांनी वेळीच दखल घ्यावी अन्यथा जनतेचा क्षोभाला तयार रहावे असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष संदीप फडकले यांनी दिला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button